छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयाला कोल्हापूर येथील विशाल एंटरप्राइजेसने तब्बल ३३ प्रकारची औषधी पुरवठा केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून ही औषधी रुग्णांना दिली जात आहे. आतापर्यंत कुणालाही त्याचा काही परिणाम झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र, खबरदारी म्हणून घाटी प्रशासनाने या औषधींचा वापर थांबून, त्याची औषध प्रशासनाकडून तपासणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात २५ हजार ९०० बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे औषध प्रशासनाच्या तपासणीतून समोर आले. त्यानंतर चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. याच तक्रारीत चौघांनी मिळून राज्यात ॲझिथ्रोमायसीन ५०० या जवळपास ८५ लाख गोळ्यांचा पुरवठा केला आहे. अंबाजोगाईच्या महाविद्यालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एन्टरप्रायजेस यांनी पुरवठा केला होता. याच एन्टरप्रायजेसने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटी येथे ३२ प्रकारच्या औषधांचा पुरवठा केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, बीड येथील आंबेजोगाई रुग्णालयातजी दोन औषधी बनावट असल्याचे उघडकीस आले आहे त्याचा विशाल एंटरप्राइजेसने पुरवठा केलेला आहे, ती दोन औषधी घाटी रुग्णालयात पुरवठा झालेली नसल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
गोळ्या पुरवठ्याची अशी साखळीमे.काबीज जनरीक हाउस ठाणे हा बाजारतून बनावट औषधी खरेदी करत होता. तो पुढे मे.ॲक्वेटीस बायोटेक प्रा. लि. भिवंडी यांना द्यायचा. तेथून मे.फार्मासिस्ट बायोटेक सुरत व मे.विशाल एन्टरप्रायेजस, कोल्हापूर यांना देत असे. कोल्हापूरच्या कंत्राटदाराकडून शासकीय रुग्णालये, वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा केला जात होता. त्यांनी पुरवलेल्या गोळ्यांवर उत्तराखंडच्या मीस्ट्रॉल फॉर्मुलेशन या कंपनीचे नाव आहे.