जालना : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासह शेतकऱ्यांचे वीजबील माफ करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करुन आगामी काळात काँग्रेस अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले होते. या परिषदेत माजी मंत्री अब्दुल सत्तार, माजी आ. सुरेश जेथलिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सरकारच्या कारभारावर टीका केली होती. परिषदेला जवळपास १२ हजार काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. परिषदेनंतर खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नसून हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करुन मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यात मनरेगाची कामे त्वरित सुरु करावीत, गरज असेल तेथे चारा छावण्या उभाराव्यात, गतवर्षीचे फळबाग विम्याचे पैसे ताबडतोब वाटप करावे, मोसंबी, डाळिंब आदी फळबागांना जीवंत ठेवण्यासाठी हेक्टरी विशेष अनुदान द्यावे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. सुरेश जेथलिया, एम.एम. शेख, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, औरंगाबाद सेवा दलाचे अध्यक्ष विलास औताडे, माजी आ. धोंडीराम राठोड, शकुंतला शर्मा, संतोषराव दसपुते, महिला आघाडीच्या अध्यक्षा आयशा मुलानी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदर चाऊस आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करा
By admin | Published: August 26, 2015 11:56 PM