औरंगाबाद : घरात अठराविश्वे दारिद्र्य, आजारी आई-वडिलांमुळे कमावणारे कोणीच नाही. त्यामुळे शेंद्रा येथील कंपनीत काम करून घर चालविणाऱ्या तरुणीला मंगळवारी रात्रीच्या भयंकर पावसाने कायमचे हिरावुन नेले. अवघे १०० मिटर अंतरावर घर असताना रेल्वे पटरीच्या शेजारील नाल्याला आलेल्या पुरात ७०० मिटर वाहुन जात रुपाली दादाराव गायकवाड (२१, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) हीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्यासोबतची म्रपाली रघुनाथ म्हस्के (१८, रा. मुकुंदनगर) ही २०० मिटर वाहत गेली, पण नशिब बल्लवत्तर म्हणून वाहत्या पाण्यात हाती आलेल्या एका झाडाला पकडल्यामुळे ती बचावली. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजेदम्यान घडली.
रुपाली व आम्रपाली शेंद्रा येथील धुत ट्रान्समिशन कंपनीत काम करतात. यावरच दोघींचे घर चालत होते. रुपालीचे आई-वडील दोघे नेहमीच आजारी पडतात. मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून, एक भाऊ लहान आहे. त्यामुळे घर चालविण्याची जबाबदारी रुपालीवरच होती. शेंद्रा येथून कंपनीचे काम संपवून दोघी मंगळवारी रात्री घरी येत होत्या. रेल्वे गेटनंबर ५६ पासून पुढील भागात रस्ता नसल्यामुळे दोघी रेल्वे पटरीनेच घराकडे चालत गेल्या. रेल्वे पटरीच्या शेजारी छोटेखानी नाल्याच्या पलीकडेच १०० मिटर अंतरावर दोघींचे घर होते. पाणी वेगाने वाहत होते. बचावलेल्या आम्रपालीने रुपालीला सांगितले, आतमध्ये नको जायचे. पण रुपाली म्हणाली, थोडेसे पाणी आहे. आपण पलीकडे जाऊ शकतो. दोघी एकमेकींच्या हाताला धरुन पाण्यात उतरल्या. तेव्हा जायच्या रस्त्यावर असलेले दगड वाहुन गेले होते. त्याठिकाणी खड्डा पडला होता. यात एकीचा पाय घसरला आणि दोघी वाहुन जाऊ लागल्या. तेवढ्यात आम्रपालीने आरडाओरड केली. पाण्यात पडल्यामुळे रुपालीच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यामुळे तिला काहीच करता आले नाही. पाणी वेगाने वाहत होते. २०० मीटर वाहुन गेल्यावर आम्रपालीने एका झाडाला पकडले. त्यामुळे ती बचावली. तेवढ्यात काही लोक पळत आले. त्यांनी तात्काळ तिला बाहेर काढले. मात्र रुपाली वेगाने पाण्यासोबत वाहुन गेली. नागरिकांनी तिकडेही धाव घेतली, मात्र तिला वाचवू शकले नाही. घटनास्थळापासून ७०० मिटर अंतरावर तिचा मृतदेह रात्री ९.३० वाजता सापडला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त करण्यात येत असून, केवळ रस्ता नसल्यामुळे कमावत्या मुलीचा जीव गेला. याला महापालिका प्रशासन आणि राजकीय पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
हेही वाचा - जालना रोडचे झाले तळे; नॅशनल हायवे ॲथॉरिटीने केलेला १३ कोटींचा खर्च खड्ड्यात
'लोकमत'ने पोलिसांना कळविलेघटनास्थळीच नागरिकांनी घाटीतून आणलेला रूपालीचा मृतदेह ठेवला होता. रस्ता झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत आक्रोश व्यक्त करण्यात येत होता. ही माहिती समजताच ‘लोकमत’ प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी पोहोचले, तेव्हा महापालिका प्रशासन, पोलीस कोणीही तेथे नव्हते. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज पगारे यांना याची माहिती ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने दिली. त्यानंतर निरीक्षक पगारे, दुय्यम निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्यासह पोलिसांचा फाैजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस विभागाने मनपाच्या अधिकाऱ्यांना कळविले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांना नियमाप्रमाणे आर्थिक मदत आणि परिसरातील नागरिकांनी रस्ता बनवून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर दुपारी ४ वाजता मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.