- संतोष हिरेमठऔरंगाबाद : नोकरभरतीसाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या अवघ्या २० वर्षीय तरुणाला रक्ताच्या कर्करोगाला सामोरे जावे लागत आहे. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत रक्ताच्या कॅन्सरविरुद्धच्या तरुणाच्या या लढ्यात गावकऱ्यांनी साथ दिली आहे. रक्तदानासाठी अनेकांनी हात पुढे केला.
राजूर (जि. बुलडाणा) येथील या कर्करोग्रस्त तरुणावर सध्या औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी अचानक अशक्तपणा जाणवण्यास सुरुवात झाल्याने त्याला कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. रक्त कमी झाले होते. शिवाय नव्याने रक्तही तयार हाेत नव्हते. तपासणीअंती रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यामुळे त्याला घाटीतून शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तरुणाच्या गावातील रहिवासी असलेल्या कर्मचाऱ्याने यासंदर्भात गावातील ॲड. तुषार उदयकार यांना माहिती दिली. ॲड. उदयकार यांनी मुलाच्या बारशाच्या कार्यक्रमात तरुणाच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.
ही माहिती देताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी उपचारासाठी मदत म्हणून जवळपास ७० हजार रुपये जमा केले. एवढेच नाही तर उपचारासाठी लागणारे रक्त, प्लेटलेटसाठी गावातील तरुणांनी रक्तदानासाठी थेट घाटीतील विभागीय रक्तपेढीत धाव घेतली. शासकीय कर्करोग रुग्णालयातील डाॅक्टरांसह विभागीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी हनुमान रुळे, किशोर खंडागळे, सुमीत पंडित, सतीश उदयकार यासह अनेक जण तरुणाच्या उपचारासाठी प्रयत्नशील आहेत.
१४ तारखेला परीक्षाउपचार सुरू असताना या तरुणाची १४ तारखेला परीक्षा आहे. हा कष्टाळू आणि होतकरू मुलगा लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडण्यासाठी गावातील सर्वजण प्रार्थना करीत आहेत.
प्रकृती स्थिरसदर रुग्णास केमोथेरपी देण्यात येत आहे. महिनाभरानंतर आणखी एक तपासणी केली जाईल. त्यातून कॅन्सरचे प्रमाण किती कमी झाले, हे लक्षात येईल. सध्या प्रकृती स्थिर आहे. आता प्लेटलेटची गरज कमी राहील.- डाॅ. दर्पण जक्कल, शासकीय कर्करोग रुग्णालय