- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : डॉक्टर म्हटले की, रुग्ण, उपचार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालय एवढेच चित्र सर्वसामान्यांच्या नजरेसमोर येते. परंतु शहरातील अनेक डॉक्टर हातात माईक घेऊन व्यासपीठावर एकापेक्षा एक सुरेल गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकत आहेत. दैनंदिन व्यस्त जीवनातही रुग्णसेवेबरोबर डॉक्टर ‘सूर’ जोपासत कलेची आराधना करीत आहेत.
आधी वैद्यकीय शिक्षण आणि त्यानंतर रुग्णसेवा, अशा व्यस्त आयुष्यात स्वत:मधील कुठेतरी हरवून गेलेला कलावंत अनेक डॉक्टरांना पुन्हा सापडला आहे. एकमेकांच्या पाठबळामुळे नेहमीच रुग्ण सेवेत मग्न असणारे डॉक्टर स्वत:मधील गायक चांगल्या प्रकारे जोपासत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) कल्चरल कमिटी असून, डॉ. मंजूषा शेरकर, डॉ. वर्षा आपटे, डॉ. प्रशांत सोनवतीकर हे सदस्य आहेत. प्रारंभी ‘आयएमए’च्या स्टेजवर कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रेक्षक हे ‘आयएमए’चे सदस्यच असल्याने मंचावर गायन करणार्या डॉक्टरांना फार काही भीती वाटत नव्हती. त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. यामधूनच अनेक डॉक्टर चांगल्या प्रकारे गात असल्याचे समोर आले.
छोट्या व्यासपीठाच्या पुढे जाऊन गायन करणार्या डॉक्टरांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतेच मोठ्या व्यासपीठावर ४० डॉक्टरांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रसिक श्रोते भारावून गेले. अमित ओक यांच्याकडून गायन, संगीतासंदर्भात मार्गदर्शन मिळाले. गेल्या तीन वर्षांत आता अनेक डॉक्टर चांगले गात असल्याचे लक्षात आले. अगदी प्रसिद्ध गायकांप्रमाणेच सोलो, ड्युएट गीत डॉक्टर सादर करतात. रुग्णसेवा देताना विविध कारणांनी येणारा ताणही दूर होण्यासाठी ही कला महत्त्वपूर्ण ठरत असल्याचा अनुभव डॉक्टरांना येत आहे.
कला महत्त्वपूर्ण‘आयएमए’च्या कल्चर कमिटीचे उपक्रम डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. गेल्या तीन वर्षांपासून नियमित कार्यक्रम होतात. नुकतेच मोठ्या व्यासपीठावर डॉक्टरांनी गाणी सादर केली. रुग्णसेवेबरोबर गायनासाठी डॉक्टर बर्यापैकी वेळ देतात. ताण दूर होण्यासाठी ही कला महत्त्वपूर्ण ठरत आहे.- डॉ. रमेश रोहिवाल, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
गायनासाठी प्रोत्साहन आराम मिळावा, डॉक्टरांबरोबर गायनाचाही हाच उद्देश असतो. रुग्णालय, रुग्ण एवढ्याच विश्वापुरते डॉक्टर मर्यादित असल्याचे दिसते. परंतु त्यापलीकडे जाऊन गायनाने एक वेगळे व्यासपीठ दिले. अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या. अनेक डॉक्टरांना गायनासाठी प्रोत्साहन मिळत आहे. ६० ते ७० डॉक्टर गातात. गायनाचा हा प्रवास आणखी वाढतच जाईल.- डॉ. मंजूषा शेरकर, कल्चरल कमिटी, आयएमए