औरंगाबाद : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा सच्चा उपासक, सुरांचे खऱ्या अर्थाने नाथ असलेले आणि मराठवाड्याची मूर्तिमंत श्रीमंती ठरलेले पंडित नाथराव नेरळकर यांचे रविवारी (दि.२८ मार्च) अल्पशा आजाराने निधन झाले आणि मराठवाड्याचा सूर‘नाथ’ काळाच्या पडद्याआड गेला. नाथराव या चालत्या- बोलत्या संगीत मैफलीने अशी अचानक घेतलेली भैरवी संगीत विश्वालाच चटका लावून गेली.ते ८६ वर्षांचे होते. १० ते १२ दिवसांपूर्वीच नाथराव औरंगाबाद येथील त्यांच्या घरीच पाय घसरून पडले आणि डोक्याला मार लागला. यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. मागील दोन दिवसांपासून आवाजही क्षीण झाला होता आणि बोलणे थांबले होते. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली, असे त्यांचे चिरंजीव गायक जयंत नेरळकर यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात मुलगा जयंत नेरळकर, अनंत नेरळकर आणि मुलगी गायिका हेमा उपासनी, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची दाद मिळाली की गाणेही रंगायचे..नवोदितांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे ही नाथरावांची खासियत होती. बाहेरगावहून शहरात येणाऱ्या कोणत्याही दिग्गज कलावंताची नजर सगळ्यात आधी प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसलेल्या नाथरावांना शोधायची आणि त्यांना वंदन करूनच मैफलीला सुरुवात व्हायची. त्यांची दाद मिळाली की, गाणेही आपसूकच रंगत जायचे, असा अनेक कलावंतांचा अनुभव आहे. गुरूवाक्यम प्रमाणम... हे तत्त्व सांभाळत नाथरावांनी आयुष्यभर संगीतसाधना केली. नांदेड येथे गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे त्यांनी संगीताची उपासना केली आणि आयुष्यभर सांभाळली. मराठवाड्यातील सांस्कृतिक वैभव लोप पावलेपं. नाथराव नेरळकरजींच्या निधनाने मराठवाड्यातील एक सांस्कृतिक वैभव लोप पावले आहे. मराठवाड्यातील संगीत क्षेत्राचा आधारवड हरपला. ‘लोकमत’ आणि पंडितजींचे संबंध अत्यंत स्नेहाचे, जिव्हाळ्याचे होते. ‘लोकमत’च्या वर्धापन दिनाला त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. मी लिहिलेली ‘माझी भिंत’ आवडल्याचे त्यांनी दूरध्वनीद्वारे आवर्जून सांगितले होते. गेल्याच वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि आता पंडितजी गेल्याची वार्ता कळली. खूप वाईट वाटले. पं. नाथराव नेरळकर यांनी संगीत क्षेत्राची मोठी सेवा केली. अनेक पिढ्या घडविल्या. त्यांचे शिष्य आज ठिकठिकाणी नावलौकिक प्राप्त करीत आहेत. पं. नेरळकर यांच्या निधनामुळे मराठवाड्याचा सुरेल आवाजच जणू बंद झाला. ते मराठवाड्याचे भूषणच होते. लोकमत परिवारातर्फे पंडितजींना भावपूर्ण आदरांजली. -राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तपत्र समूह
सूरनाथाचा अस्त..! पं. नाथराव नेरळकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 8:53 AM