औरंगाबाद : विनामास्क विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास मज्जाव करत महापालिकेच्या नागरिक मित्र पथकाला मारहाण करून धमकी दिल्याच्या गुन्ह्यात क्रांती चौक पोलिसांनी अटक केलेले माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी आणि अतिश जोजारे यांना गुुरुवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची हर्सूल मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
गुलमंडी परिसरात रस्त्यावर महापालिकेचे नागरिक मित्र पथकाचे जवान १ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता विनामास्क विद्यार्थ्यांवर कारवाई करत होते. यावेळी माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी आणि कार्यकर्ता अतिश जोजारे यांनी पथकासोबत वाद घालून जवानांना मारहाण केली. पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत तेथून हाकलून दिले होते. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून पथकाला मारहाण करणारे कुलकर्णी आणि जोजारे यांना अटक केली होती. दुसऱ्या दिवशी न्यायालयाने आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आणि हर्सूल जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्यांची रवानगी सायंकाळी जेलमध्ये केल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांनी दिली.
============
तनवाणी यांना अटक करणार
पोलीस निरीक्षक दराडे म्हणाले की, या प्रकरणातील तिसरे आरोपी किशनचंद तनवाणी यांनाही लवकरच अटक केली जाईल.