वाळूज महानगर : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) च्या औरंगाबाद ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश वाघचौरे यांची निवड करण्यात आली आहे. मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष संजयराव तायडे यांनी नुकतीच ही निवड केली आहे. या निवडीबद्दल मेस्टाचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वाघचौरे यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
फोटो क्रमांक- सुरेश वाघचौरे (निवड)
----------------------------
चोरट्याने दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील कंपनीच्या गेट समोरुन दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र मधुकर गायकवाड हे भाऊ निशांत गायकवाड यांच्या नावावर असलेल्या दुचाकीने (एम.एच.२०, डी.एन.०३९५) ९ जूनला उद्योगनगरीत कामासाठी आले होते. उमास ऑटो कंपोनंट या कंपनीसमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने संधी साधून चोरुन नेली.
-------------------------------
रांजणगावची महिला बेपत्ता
वाळूज महानगर : रांजणगावातून बजाजनगरात कामानिमित्त आलेली महिला रविवारी (दि.२०) बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिली आहे. स्वाती आनंद पंडित (२८ रा.पवननगर, रांजणगाव) ही रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास बजाजनगरातील मोरे चौकातून बेपत्ता झाली आहे. सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिचा पती आनंद पंडित याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
--------------------------------------
पंढरपुरात टीव्ही फोडून कागदपत्रे लांबविली
वाळूज महानगर : पंढरपुरात महिलेच्या घरातील टीव्ही फोडून रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे लांबविणाऱ्या विरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्ज्वला परमेश्वर ढगे (२४ ) ही मुलगी शिवानी (८) हिच्या सोबत पंढरपुरात वास्तव्यास असून, कंपनीत काम करुन कुटुंबाची उपजीविका भागविते. या महिलेच्या ओळखीचा असलेला समाधान प्रताप कल्याणकर (रा.मिटमिटा) हा महिला कामावर गेलेली असताना तिच्या घरी आला. यानंतर समाधान याने महिलेची मुलगी शिवानी ही घरात असतांना टीव्ही फोडला तसेच पर्समधील एक ते दीड हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पसार झाला. या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांनी उज्ज्वला ढगे यांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
-------------------
पंढरपुरात विवाहितेचा छळ
वाळूज महानगर : घर बांधण्यासाठी ५ लाखाची मागणी करुन एका २० वर्षीय विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या ५ जणांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रेश्मा फारुक शेख या विवाहितेस तिचा पती फारुक शेख व घरातील मंडळी घर बांधण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होते. सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून रेश्मा शेख हिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
-------------------------