औरंगाबाद : शहरातील वेदांतनगरात राहणाऱ्या ९४ वर्षीय सुरजाबाई रतनलाल जैन यांनी जगण्याची जिद्द, आत्मशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. सोमवारी रात्री हॉस्पिटलमधून त्या घरी आल्या तेव्हा त्यांची मुले, सुना, नातवंडे यांनी जल्लोषात स्वागत केले. आपल्या घरात, परिवारात आल्यामुळे आजीबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरून तो ओसंडून वाहत होता.
त्या माजी नगरसेवक विकास जैन यांच्या आई आहेत. सुरजाबाईंचा ४ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. लगेच २५ एप्रिल रोजी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वय ९४ वर्षे, वजन अवघे ३५ किलो वजन असल्याने डॉक्टरांसाठी हे एक आव्हान होते. मात्र, सुरजाबाईंनी प्रबळ आत्मशक्ती व सकारात्मक विचारांमुळे कोरोनावर मात करून आपले घर गाठले. जेव्हा त्या घरी आल्या होत्या त्यावेळी घर दिवाळीसारखे सजविण्यात आले होते. अंगणात सुरेख रांगोळी रेखाटण्यात आली होती. दिव्यांचा झगमगाट करण्यात आला होता. त्यांचे आवडते कृष्णाचे भजन लावण्यात आले होते. सुनांनी सासूबाईंचे औक्षण केले. नातवंडांनी त्यांच्या गळ्यात हार घातला. असे आनंदी वातावरण निर्माण झाले. कोरोनावर मात करून सुखरूप माझ्या घरी आले, माझी मुले, सुना, मुलगी, नातवंडांत आल्याने त्यांना आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते.
चौकट
विकास, आता मी बरी आहे ना !
सुरजाबाई मंगळवारी सकाळी मुलगा विकास यांना म्हटल्या की, ‘विकास मी बरी आहे ना !’ हे आईचे वाक्य एकूण विकास यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहू लागले. ‘आई तू एकदम ठणठणीत आहे’, असे त्यांनी सांगितले. तेव्हा आईच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून सर्वजण सुखावले. तो क्षण माझ्या व परिवारासाठी अनमोल होता, असे विकास जैन यांनी सांगितले.
चौकट
आजीबाईंना आवडतो आमरस
सुरजाबाई यांना आमरस सर्वाधिक आवडतो. हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यांनी आमरसाचा आस्वाद घेतला. याशिवाय टीव्ही मालिका त्या पाहतात. त्यातल्या त्यात ‘रामायण’ व ‘महाभारत’ ह्या संपूर्ण मालिका त्यांनी पाहिल्या.