- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील धावडा येथील एका शेतकऱ्यांकडे असलेल्या हिरा नावाच्या बैलाला दररोज १० लिटर दुध,४ अंडी, काजू बदाम,खारीक, खोबरा, गूळ, शेंगदाणे खायला लागतात. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल मात्र हे सत्य आहे यामुळेच त्याने सिल्लोड तालुक्यातच नव्हे तर परजिल्ह्यात एकाच महिन्यात ८ शंकर पट शर्यती जिंकल्या आहे.एका महिन्यात त्याने शेतकऱ्याला लखपती बनवले त्या हिऱ्याला तब्बल ९ लाखांची किंमत लागली आहे. सिल्लोड तालुक्यातील आमठाना जवळील धावडा येथील प्रगतिशील शेतकरी नाना बावस्कर यांचा तो बैल आहे.
औरंगाबाद लगतच्या पिसादेवी येथील बैलगाडा शर्यत शौकिन ओंकार पाटील पखे या श्रीमंत शेतकऱ्याने उपरोक्त ठिकाणच्या शर्यतीला हजेरी लावली होती तेथे त्यांनी हिराचे तेज हेरले व तब्बल ९ लाख रुपयांत या हिराला सोन्याची किंमत देऊन खरेदी केले यामुळे हा हिरा नावाचा बैल "नवलखा" झाला आहे.
बैलगाडा शर्यत अर्थात शंकर पट शर्यतीला नुकताच केंद्राने सशर्त हिरवा कंदिल दिला आहे.गत ७ वर्षांपासून सदर शर्यती बंद होत्या. शंकरपट शर्यतीस दीर्घ परंपरा आहे. दिवाळीनंतर गावोगावी यात्रा उत्सव सुरू होतात सिल्लोड तालुक्यातील आमठाना जवळील धावडा येथील प्रगतिशील शेतकरी नाना बावस्कर यांना सुरुवातीपासून शंकरपटा आवड आहे. २०१४ साली त्यांच्या बैलजोडीने भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे स्पर्धेत ५१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळवले होते. त्याआधी ही त्यांनी अनेक स्पर्धा जिंकून राज्यात नाव कमावले.
यावर्षी जून महिन्यात त्यांनी आमठाना येथून ३२ हजारात २ वर्षे वयाचा गोऱ्हा विकत आणला होता. त्यांनी त्याचे नाव "हिरा" ठेवले आधीचा अनुभव गाठीशी असल्याने त्यांच्या नजरेत हा गोऱ्हा चपकल बसला. पोटच्या मुलासारखा त्यांनी त्यास जीव लावला. योग्य तो खुराक त्यास दिला. रोज त्याकडून धावण्याच्या सराव करून घेत.
बावस्कर यांनी या हिऱ्याच्या जोरावर डिसेंबर महिन्यात अंभई येथे २ वेळा,नानेगाव येथे २ वेळा ,चारनेर वाडी,जालना जिल्ह्यातील तुपेवाडी ,सीरसाळा ,टाकळी, तळेगाव (हसनाबाद) आदी ८ ठिकाणी झालेल्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला या हिऱ्याने हौशी बैलगाडी मालक शेतकऱ्याला सव्वा लाखांची बक्षीस जिंकून दिली.
या हिऱ्याच्या जोडीला बावस्कर यांच्या मित्राचा लक्षा बैल होता. शुक्रवारी तळेगाव येथील शर्यतीत ३१० फुटांचे अंतर हिरा व लक्षा बैल जोडीने अवघ्या ६:६० सेकंदात पार केले.तेथे ८ जिल्ह्यातील सुमारे ८०० बैलजोड्या सहभागी होत्या.अंभई येथील स्पर्धेतील ३०० फुटांचे अंतर तर अवघ्या ६:४७ सेकंदात गाठले.व प्रथम क्रमांक पटकावला होता.
दमदार खुराक....अवघे २ वर्ष ७ महिने वय असलेल्या या हिऱ्यास मी दररोज सकाळी ५ व संध्याकाळी ५ असे रोज 10 लिटर दुध गत ६ महिन्यापासून पाजत आहे. यासह सकाळ, संध्याकाळ रोज ४ अंडी, काजु-बदाम, खारीक, खोबरे हा मिश्र सुकामेवा रोज पावकीलो, शेंगदाना पेंड ८०० ग्राम, अर्धा किलो गूळ, शाळू ज्वारीचा चारा-कुट्टी हा त्याचा रोजचा खुराक आहे. असा खुराक आम्हाला कधी मिळाला नाही. चटणी भाकर खाऊन आम्ही शेती करतो, पण शंकर पटाचा छंद आहे म्हणून हे सर्व केले. - नाना बावस्कर, बैलमालक