मुजीब देवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : शहरात ४२० पेक्षा अधिक होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. यातील बहुतांश होर्डिंग्जचे स्टील डिझाइन तज्ज्ञ अभियंत्यांकडून घेण्यात आलेले नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक एजन्सीधारक अनुभवी व्हेंडरला होर्डिंग उभारण्याचे काम सोपवितात. हे अतिशय धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. होर्डिंगची दरवर्षी डागडुजी आवश्यक आहे. ९९ टक्के एजन्सीधारक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वादळवाऱ्यात काही नाजूक होर्डिंग्ज कोसळतात.
घाटकोपरमधील घटनेनंतर धोकादायक होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने होर्डिंग एजन्सीच्या बैठका, स्टेबिलिटी प्रमाणपत्र, स्ट्रक्चरल ऑडिट आदी मुद्द्यांवर भर देण्यास सुरुवात केली आहे.
‘लोकमत’ने या विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास सुरू केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यातील एक म्हणजे अनेक एजन्सीधारक होर्डिंग उभारण्यापूर्वी त्याचे डिझाइन तज्ज्ञ अनुभवी अभियंत्याकडून तयार करून घेत नाहीत. व्हेंडरला संपूर्ण होर्डिंग उभारण्याचे काम देऊन मोकळे होतात. महापालिकेला नंतर कोणत्याही अभियंत्याकडून घेतलेले स्टेबिलिटी सर्टिफिकेट सादर करतात. महापालिकाही डोळे बंद करून कागदपत्रांचा स्वीकार करते.
डागडुजीकडे होते दुर्लक्ष
होर्डिंग एजन्सीधारक दरवर्षी डागडुजीकडे दुर्लक्ष करतात. संपूर्ण होर्डिंगला पेन्ट करायला हवे. कुठे वेल्डिंग निखळली असेल तर ती दुरुस्त करावी. सिमेंटच्या बेसमेंटजवळ अनेकदा खोदकाम होते. वाहनांचा धक्का लागतो. त्यामुळे होर्डिंगला धोका निर्माण झाला का? या सर्व गोष्टी अत्यंत बारकाईने तपासल्या गेल्या पाहिजेत. मात्र, तसे होत नाही. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड या राष्ट्रीयीकृत संस्थेने काही निकष ठरवून दिलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी हवेचा दाब ३९ मीटर पर सेकंदच्या दृष्टीने निकष ठरवून दिले आहेत. तज्ज्ञ अभियंता या निकषानुसार स्टील डिझाइन करतो. डिप्लोमाधारक किंवा अन्य व्यावसायिक हे निकष पाळत नाही.
महापालिकेत स्वतंत्र सेल असावा
होर्डिंगचे डिझाइन तपासणे, त्याला परवानगी देणे, वेळोवेळी तपासणी करणे यासाठी पॅनल तर आहे. मात्र, स्वतंत्र सेल नाही. एका स्वतंत्र सेलमार्फत ही कामे करायला हवी. मनपाच्या वाईट व्यवहारामुळे अनेक तज्ज्ञांनी पॅनलवरून राजीनामा दिलेला आहे.
घाटकोपर येथील घटना दुर्दैवी होती. संबंधितांनी अगोदरच योग्य काळजी घेतली असती तर दुर्घटना टाळता आली असती. शहरातही अनेक होर्डिंग्ज आहेत. नियम आणि काळजी घेतली तर दुर्घटना टाळता येते. - एम.डी. युनूस, ज्येष्ठ वास्तुविशारद