---
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : झकास पठार योजनेतून गोगाबाबा टेकडी ते औरंगाबाद लेणीच्या वरच्या पठारावर रानफुलांची लागवड आणि संवर्धन शक्य आहे का, याचे सर्वेक्षण सोमवारी सकाळी करण्यात आले. गेल्या आठवड्यात भेंडाळा आणि सारोळा येथील टेकड्यांच्या पठारांचेही सर्वेक्षण झाले असून, गौताळा आणि अजिंठा लेणीच्या व्ह्यू पाॅईंट लेणापूर परिसरातही सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवली जात आहे. डॉ. गोंदवले, मिलिंद गिरधारी, आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे, हिमांशू देशपांडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, गणेश कासले यांनी ही पाहणी केली. आर्किटेक्ट देशपांडे म्हणाले, झकास पठार योजनेची संकल्पना व्यापक आहे. पहिल्या पावसापूर्वी सर्वेक्षण, तेथील मातीपरीक्षण, लागवडीला मिळणारा प्रतिसाद याबद्दलची कल्पना पहिल्या पावसात येईल. त्यासाठी जागेची निवड, तेथील सध्याच्या रानफुलांच्या वनस्पतींचे संवर्धन व लागवडीची शक्यता यासंबंधी ड्रोन कॅमेराने शुटिंग केले आहे. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवत आहोत. टप्प्याटप्प्याने करता येणाऱ्या कामांचा त्यात समावेश आहे. या विषयातील तज्ज्ञ गिरधारी यांचाही या प्रकल्पात सुरुवातीपासून सहभाग आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतींच्या मदतीने विविध रानफुलांच्या बियांचे संकलनही गेल्यावर्षी करुन ठेवले आहे. पावसाळ्यापूर्वी संकलित बियांची लागवड करुन कमी खर्चात काही प्लाॅट तयार करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.
----
१० हेक्टरचा प्लाॅट तयार करण्याचे नियोजन
---
भेंडाळा, सारोळा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, गौताळा परिसरात ५ प्लाॅटचे संवर्धन आणि लागवडीसाठी हे सर्वेक्षण सुरु आहे. त्याला मिळणाऱ्या यशानुसार पुढील काम करण्यात येईल, असे देशपांडे म्हणाले. प्रत्येक ठिकाणी १० हेक्टरचा प्लाॅट करण्यासाठी ड्रोनद्वारे शुटिंग केले. गौताळा आणि अजिंठा लेणी परिसरात पुढील काही दिवसात सर्वेक्षण केले जाणार असून, अनुकूल ठिकाणांची निवड केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.