सातारा जिल्ह्यातील कास पठार या ठिकाणी विविध जातींचे विविधरंगी फुलांचे पठार असून, हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या धर्तीवर काही पठारे विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत असून, त्यादृष्टीने पावले टाकली जात आहेत. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले यांनी पाहणी करून आठ टेकड्या निश्चितही केल्या आहेत.
जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले म्हैसमाळ, शुलीभंजन, भेंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौताळा, अजिंठा, गोगाबाबा टेकडी, भेंडाळा मारुती पठार व अन्य अशा आठ टेकड्यांच्या परिसरात कास पठाराच्या धर्तीवर पुष्पांचे बीजारोपण करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी भेंडाळा मारुती परिसरातील पठाराची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहणी करण्यात आली. याची माहिती संकलित करून पुष्प बीज टाकण्यासाठी भाग निश्चित केला जाणार आहे. यावेळी सीईओ मंगेश गोंदावले, उपमुख्य कार्यकारी कवडे, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, खुलताबादचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, वन परिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर आदींची उपस्थिती होती.
चौकट
७० प्रकारचे पुष्पबीज संकलित
पश्चिम घाट परिसर असलेल्या सातारा जिल्ह्यातील तापमान, भौगोलिक हवामान व त्याच अंगाने जिल्ह्याचाही विचार करून स्थानिक पातळीवरील सांगली, सातारा, बुलडाणा, नाशिक आदी परिसरात उगवणारे ७० प्रकारचे पुष्पबीज संकलित केलेले आहे. जिल्ह्यात राबवण्यात येणारा एक नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून झकास पठाराच्या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. या प्रयोगासाठी दोन्ही जिल्ह्यांचे हवामान, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन व प्रत्येक जिल्ह्यात असणारे विशिष्ट प्राणी, वनस्पती आदींचा तज्ज्ञांकडून अभ्यास करून त्यानुसार झकास पठार आकारास आणण्यासाठी काम सुरू असल्याचे प्रकल्प समन्वयक स्वप्नील सरदार यांनी सांगितले.
फोटो : ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करताना पथक.
190421\20210419_171150_1.jpg
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षण करताना पथक.