पैठण : शहरात गोरगरिबांना डावलून घरकुल योजनेत शहरातील धनदांडग्यांचा समावेश करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करून गैरप्रकाराच्या चौकशीसाठी गुरुवारी शहरात धरणे आंदोलन करण्यात आले. योजनेतून डावललेल्या शेकडो नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला. शासकीय जागेवर घराच्या प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या नागरिकांचा नगर परिषदेने बंद केलेला सर्व्हे चालू करावा, गोरगरिबांच्या यादीत प्रशासनाने समाविष्ट केलेली धनदांडग्यांची नावे वगळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आय आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.
या आंदोलनात वारे तेरा कायदा धनदांडग्यांचा फायदा, गरिबांच्या घरावर ज्यांनी मारला डल्ला, त्यांच्या विरोधात आमचा कायदेशीर हल्ला, अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी देत परिसर दणाणून सोडला होता. भूमिअभिलेख विभाग व नगर परिषद पैठणने शहरातील फक्त ५३५ अतिक्रमणधारकांचे सर्व्हे केला. यापैकी फक्त ७ लोकांच्या जागेची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले. यात दारू व्यावसायिकांसह, शिक्षक, मुख्याध्यापक असून ते मंत्री भुमरे यांचे नातेवाईक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता गोर्डे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माऊली मुळे, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, भाऊसाहेब तरमळे, विलास शेळके, प्रवीण शिंदे, आप्पासाहेब गायकवाड, विशाल थोटे, प्रकाश बनसोडे, भिकाजी आठवले, फाजल टेकडी, निमेश पटेल, तमिजउद्दीन इनामदार आदी उपस्थित होते.
----- लोकमतने आणला गैरप्रकार बाहेर --------
सर्वांसाठी घरे या केंद्र व राज्य सरकारच्या मोहिमेअंतर्गत शासकीय जागेवर २०११ पूर्वीपासून अतिक्रमण करून जे नागरिक राहात आहेत, अशांच्या सर्व्हे करून ती जागा नियमित करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. परंतु, पैठण शहरात न.प. प्रशासनाने धनदांडग्यांची नावे अतिक्रमणात दाखवून गोरगरिबांच्या जागेचा सर्व्हे न करताच मोहीम गुंडाळली होती. याबाबत लोकमतने वृतमालिका प्रकाशित करून हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता. यानंतर याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार पैठण यांनी नगर परिषदेस दिले होते.
120821\img_20210812_183649.jpg
पैठण. धरणे आंदोलन प्रसंगी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोर्डे, यावेळी व्यासपीठावर उपस्थित आप्पासाहेब निर्मळ, विनोद तांबे, निमेश पटेल, अनिल घोडके, विलास शेळके, भाऊसाहेब तरमळे, अनिल घोडके आदी.