सोयगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात कोविडचा प्रसार थांबविण्यासाठी पुन्हा ४५ ते ६० वर्ष वयोगटांतील विविध आजारांनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठांचे गृहभेटी देऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून शिक्षकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणामध्ये ४५ ते ६० वर्ष वयोगटातील ज्येष्ठांचे गावनिहाय त्यांच्या गृहभेटी केल्या जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या गर्तेत सर्वेक्षण करण्याचा प्रयोग प्रशासनाने घेतला आहे. याबाबत तातडीचे आदेश तहसील कार्यालयाला प्राप्त झाले असून ज्या भागात २० पेक्षा अधिक संसर्गबाधित रुग्ण आढळून आले आहे. अशा ठिकाणी रुग्णांच्या संपर्कातील किमान २० जणांची चाचणी केली जाणार आहे. गावातील आशा स्वयंसेविका , अंगणवाडीसेविका व एक शिक्षक अशी पथके नियुक्त करण्यात आली आहे.
ही पथके मंगळवार दि.२३ पासून सर्वेक्षण सुरू करणार आहेत. त्यात ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव, लक्षणे असलेली तसेच सारीचा प्रादुर्भाव झालेल्या, अन्य गंभीर आजार असलेल्या लोकांची यादी तयारी केली जाईल. या सर्वेक्षणाची यादी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली जाईल. त्यानंतर तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.