औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने मराठवाड्यातील लहान-मोठ्या पुलांचे सर्वेक्षण करून त्यांची दुरुस्ती करून घ्यावी. जि.प.ने सर्व तलाव, पाझर तलाव, नद्याकाठावरची गावे यांची प्रत्यक्ष पाहणी करून संरक्षणाचे उपाय करावेत. ज्या ठिकाणी तलाव, धरणाच्या भिंती, दरवाजे, इतर बाबींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती कामे पूर्ण करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी दिले. पावसाळा दोन आठवड्यांवर आलेला असताना सर्वेक्षण आणि दुरुस्ती करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.
विभागीय आयुक्तालयात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक झाली. बैठकीत केंद्रेकर म्हणाले, धरणे, पाझर तलाव या ठिकाणी २४ तास देखरेख यंत्रणा ठेवा. नदीपात्रात अतिक्रमणे असल्यास तत्काळ काढा. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील गोदावरी पात्रात पडणाऱ्या पावसाची माहिती घेत गोदावरीच्या उपनद्यांच्या स्थितीवर लक्ष ठेवावे. बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना या जिल्ह्यांनी दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन केंद्रांची स्थापना करावी. मनपा, नपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींची पाहणी करून त्यांना नोटीस देण्यात यावी. नालेसफाई, ड्रेनेज, पाइपलाइन दुरुस्ती तातडीने करून धोकादायक व अनधिकृत होर्डिंग ताबडतोब काढावेत.
विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व संबंधित यंत्रणेचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
विभागातील बहुतांश बंधारे नादुरुस्तपाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नद्यांवरील धरणे व बंधाऱ्यांवरील गेट सुस्थितीत असल्याबाबत तपासणी करून तसा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश केंद्रेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, विभागातील अनेक बंधाऱ्यांवर दरवाजे नादुरुस्त आहेत. या वर्षात निधी न मिळाल्यामुळे ते काम झालेले नाही. परिणामी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग इत्यादी बाबींचे संनियंत्रण करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.