औैरंगाबाद : दूधपेडा, दुरी, गुलाबखस, कालापहाड, इम्रती, शेंद्र्या, शक्करगोटी, मारुत्या, पपय्या... हे काही खाद्यपदार्थ, मिठाई, शीतपेयांची नावे नाहीत. काळाच्या ओघात लुप्त झालेल्या गावरान आंब्याची नावे आहेत. पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याच्या आमराई होत्या; मात्र गावरान आंब्याची जागा आता केशर आंब्याने घेतली आहे. यामुळे नवपिढी तर गावरान आंब्याच्या चवीलाच मुकली आहे.
पूर्वी धोंड्याच्या महिन्यात कांद्याची भजी, कुरडई आणि सोबत रसरसीत गावरान आंबा... सासरच्या या मेजवानीने जावई खुश होऊन जात. गावरान आंबा चोखून खाताना त्याच्या रसाचे डाग शर्ट, बनियनवर पडत, तसेच आमरसाचा डाग पडलेला शर्ट घेऊन मिरविण्यातही त्याकाळी औैरच मज्जा होती.
मात्र, केशर, हापूस आंब्याच्या मार्केटिंगमुळे गावरान आंबा मागे पडला. काळाच्या ओघात गावरान आंब्याच्या असंख्य जाती लुप्त झाल्या आहेत. अनेकांनी जुन्या आमराई तोडून टाकल्या. परिणामी, आजकालच्या बच्चे कंपनीला गावरान आंब्याची चवच माहिती नाही; मात्र अशा परिस्थितीतही हिमायतबागेत परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हिमायतबागेतील संशोधन केंद्रात गावरान आंब्याचे संवर्धन केले जात आहे.
( फोटोफ्लिक : हे आहेत औरंगाबादच्या हिमायत बागेतील दुर्मिळ गावरान आंबे )
४० वर्षांपूर्वी जिल्ह्यात ३०० पेक्षा अधिक जातींचे गावरान आंबे होते. त्या आंब्याचा आकार, रंग, चव, स्थळ व राजांच्या आवडीनुसार गावरान आंब्यांना नाव देण्यात येत असे. काळाच्या ओघात आमराई नष्ट झाल्या, आता फक्त बोटावर मोजण्याइतक्याच गावरान आंब्याच्या जाती शिल्लक राहिल्या आहेत. गावरान आंबे नष्ट होऊ नये म्हणून हिमायत बागेत या जातींचे संवर्धन करण्यात येत आहे. आजही शहरात अनेक आंबेशौैकीन परिवार आहेत. ते हिमायत बागेत जाऊन खास गावरान आंबे खरेदी करतात. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. प्रत्येक गावरान आंब्याची चव, आकार, रंग वेगवेगळा असतो. ते फक्त कृषीशास्त्रज्ञ, विक्रेते व आमराईवाल्यांनाच कळते. हिमायत बागेत या गावरान आंब्यांची मार्च महिन्यापासून कलमे करण्यास सुरुवात होते व जूनमध्ये शेतकरी कलमे घेऊन जातात. गावरान आंब्यावर संशोधन होण्याची व त्या दुर्मिळ जाती पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान कृषीशास्त्रज्ञांसमोर आहे.
कर लागण्याच्या भीतीने आमराई नष्ट केल्या१९७० च्या कालावधीत शासनाने ठरविले की, श्रीमंत शेतकऱ्यांवर कर बसवायचा. त्यात आंब्याचेही उत्पन्न चांगले असल्याने आंब्यावरही कर लावला. पटवाऱ्यांना झाडे मोजण्याचे आदेश दिले गेले. अनेकांनी त्यावेळी आंब्याची झाडे तोडली. पुढे शासनाने आंब्यावर कर न लावण्याचा निर्णय घेतला; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लोकांनी आमराई नष्ट करून टाकल्या होत्या. कराच्या भीतीने झाडे नष्ट केली. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ झाला. त्याचा फटका मागील दोन दशकांत लोकांना बसला आहे.
गावरान आंब्यांची चित्र-विचित्र नावे चवीनुसार, रंगानुसार, आकारानुसार, स्थळानुसार गावरान आंब्यांची नावे पडली आहेत. हिमायत बागेत कृषी विद्यापीठ केशर आंबा संशोधन केंद्रांतर्गत संवर्धन करण्यात आले आहेत. दूधपेडा, दोरी, पपय्या, गुलाबखस, इम्रती, कालापहाड, अंडा, अम्लेट, हूर, बत्ताशा, आचार्या, जाम, गोमाशा, नागीन, फकिऱ्या, खोबऱ्या, दुधी, रताळू, श्रावण्या, शेंद्र्या, शक्कर गोटी, मल्लिका, सिंधू, बसंतबोटी, मारुत्या, गोवामनकुर, निरंजन, रत्ना, मालोदा, चंबू, चौसा या गावरान आंब्यांचा समावेश आहे. औरंगाबादेत निजामाचे राज्य होते तेव्हा हिमायत बाग तयार करण्यात आली. निजामाला जो आंबा पसंत पडला त्यास ‘निजाम पसंत’, त्यांच्या बेगमला आवडलेला आंब्यास ‘बेगमपसंत’, तर सरदारच्या नावाने ‘सरदाऱ्या’ अशा नावांचे आंबेही आहेत. प्रत्येक आंब्याची चव निराळी आहे, अशी माहिती कृषीशास्त्रज्ञ संजय पाटील (फळ संशोधन केंद्र, हिमायत बाग) यांनी दिली.