औरंगाबाद : पूर्वी मुबलक वीज उपलब्ध नसल्याने महावितरण भारनियमन करीत असे. आता वीज मुबलक प्रमाणात आहे; मात्र वीजगळती व कोट्यवधीची थकबाकी असल्याने ग्रामीण भागात ६ ते ९ तासापर्यंत भारनियमन केले जात आहे. फिडरनुसार वीजगळती किती होते त्यानुसार भारनियमन केले जात असल्याने सरसकट त्या फिडरवरचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. या सामूहिक शिक्षेमुळे वीज बिल भरणाऱ्यांच्या घरातही अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. परिणामी, वीज बिल न भरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. महावितरणने उधारी बंद केली आहे. आता जे ग्राहक वीज बिल भरतील त्यांनाच वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पूर्वी एकाच वेळी संपूर्ण गावात भारनियमन केले जात असे; मात्र यामुळे जे प्रामाणिकपणे वीज भरतात त्यांच्यावर अन्याय होत असल्याने महावितरण मागील तीन वर्षांपासून फिडरनिहाय भारनियमन करत आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर वगळता जिल्ह्यामध्ये २ लाख ३१ हजार १६४ वीज ग्राहक आहेत. त्यापैकी ५२ हजार ६८८ घरगुती ग्राहकांकडे १५ कोटी २० लाख रुपये थकले आहेत. २७९० व्यावसायिक ग्राहकांकडे २ कोटी ३ लाख व ५३४ औद्योगिक ग्राहकांकडे १ कोटी ६३ लाख, तसेच १ लाख ७३ हजार ९५६ ग्राहकांकडे ६८९ कोटी ५८ लाख रुपये थकले आहेत. याशिवाय पाणीपुरवठा करणाऱ्या ९१६ कार्यालयांकडे १६ कोटी १५ लाख रुपये असे एकूण ७१६ कोटी ६१ लाख रुपये थकबाकी निर्माण झाली आहे. वीजगळती व थकबाकीचा फुगलेला आकडा लक्षात घेता नियमित वीज भरणाऱ्यांची मानसिकता बदलत आहे. राज्यभरात फिडरनिहाय भारनियमन करण्यात येत आहे. ४२ ते ४५ टक्के वीजगळती, थकबाकी आहे अशा फिडरवर भारनियमन करण्यात येते; मात्र याच फिडरवर ग्राहकांना असेही कनेक्शन दिले आहेत, जे नियमित वीज बिल भरणा करतात. त्यांना बिल भरूनही भारनियमनाचा फटका सहन करावा लागत आहे. बिल भरूनही घरात ६ ते ९ तास अंधार असेल, तर बिल भरून काय फायदा असे म्हणत प्रामाणिक ग्राहकाचा कलही बिल न भरण्याकडे होत आहे. खाजगी कंपनीकडून एनर्जी आॅडिट करण्यात यावेफिडर असो की डीटीसी येथे बसविलेल्या मीटरमधून एनर्जी आॅडिट केले जाते. मात्र, हे आॅडिट महावितरणचे कर्मचारी करतात. वीजगळती व थकबाकीचा क्लेम आपल्यावर येऊ नये, या करिता आॅडिटमधून सत्य परिस्थिती बाहेर येत नाही. जर खाजगी कंपनीला एनर्जी आॅडिटचे काम दिले तर कोणत्या फिडर तसेच ट्रान्स्फार्मरमधून किती वीज गळती होते याची सूक्ष्मपणे तपासणी होईल. त्यातून सत्य आकडेवारी समोर येईल. तसेच ज्या ट्रान्स्फार्मरवरून गळती अधिक आहे. तिथील वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांचेच विद्युत कनेक्शन तोडण्यात यावे, यामुळे प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होणार नाही. हेमंत कापडिया, ग्राहक प्रतिनिधी, वीज नियामक आयोग७२ फिडरवर भारनियमनऔरंगाबाद जिल्ह्यातील ९७ फिडरपैकी ७२ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. प्रत्येक फिडरवर एनर्जी मीटर लावण्यात आले आहे. तसेच त्या फिडरवरील प्रत्येक ट्रान्स्फॉर्मरवर डिस्ट्रिब्युशन ट्रान्स्फॉर्मर सेंटर (डीटीसी) बसविण्यात आले आहेत. याद्वारे ट्रान्स्फॉर्मरवरून केला गेलेला वीज पुरवठा व प्रत्यक्षात झालेला वापर व वसुली हे लक्षात घेतले जाते. ज्या फिडरवर ४२ ते ४५ टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती, वीजचोरी, थकबाकी आहे, अशा फिडरवर ६ ते ९ तासादरम्यान भारनियमन केले जाते. आठ तालुक्यातील ७२ फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे. या फिडरवरही नियमितपणे वीज बिल भरणारे ग्राहक आहेत; मात्र त्यांचा विचार महावितरण करीत नाही. कारण, सर्वजण काही वीज चोरी करीत नाहीत.
चोर सोडून संन्यासाला सजा
By admin | Published: June 13, 2014 1:08 AM