औरंगाबाद : पैसा खूप चंचल आहे. तो आज आहे, तर उद्या नाही. तुमच्या कामासोबत तुम्हाला पैसा मिळणारच; पण त्या पैशापेक्षाही महत्त्वाचे आहे, तुमचे माणूसपण. ‘पैसा नहीं, आदमी बड़ा होता है, और होना ही चाहिए...’ अशा शब्दांत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांनी माणूस आणि पैसा यांच्यातील फरक अत्यंत चपखलपणे सांगितला होता. सुशांत यांच्या याच गप्पा शूटिंगच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला रविवारी आठवत होत्या. सुशांत यांच्या आत्महत्येचे वृत्त येताच औरंगाबादकरांना त्यांची औरंगाबाद भेट आठवून गेली.
२०१५ साली आॅक्टोबर महिन्यात ‘एम.एस. धोनी दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने सुशांत औरंगाबाद येथे आले होते. अभिनेत्री किआरा आडवाणी, दिग्दर्शक नीरज पांडे आणि सुशांत यांचा तेव्हा तीन दिवस शहरात मुक्काम होता. चित्रपटाचे बहुतांश शूटिंग ताज इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट येथे झाले होते. शूटिंगदरम्यानच्या अनेक आठवणी इन्स्टिट्यूटचे महाव्यवस्थापक सतीश पवार यांनी सांगितल्या.
पवार म्हणाले की, शूटिंगच्या काळात सुशांत यांचा आणि त्यांचा अनेकदा संपर्क आला. या ओळखीत सर्वात जास्त भावला तो सुशांत यांचा साधेपणा. एवढा मोठा कलाकार आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येणार म्हटल्यावर खरेतर काय आणि कशी तयारी करावी, याच विचारात आम्ही होतो; पण त्यांनी कुठेही त्यांचे स्टारपण मिरवले नाही. आमच्यातीलच एक होऊन ते आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचे. शहराविषयी शहरातील विविध बाबींबद्दलही त्यांनी खूप काही जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
हायलाईट्स : 1. छोट्या शहरातून आलेला हा कलाकार कायम पाय जमिनीवर ठेवूनच वावरत होता. सामान्य माणसाप्रमाणेच ते येणाऱ्या प्रत्येकाला भेटत होते. याविषयी सांगताना सतीश पवार म्हणाले की, कोणीही गॉडफादर नसताना बॉलीवूडमध्ये पदार्पण करणे कसे कठीण होते, याविषयी मी त्यांना एकदा विचारले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, स्ट्रगल कोणालाही चुकलेला नाही.
2. प्रत्येक माणसाला आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर स्ट्रगल करावाच लागला आहे. प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळते, हीच गोष्ट मनात ठेवून मी या क्षेत्रात आलो आहे. आयुष्याकडे एवढ्या सकारात्मकतेने पाहणाऱ्या या कलाकाराला मृत्यूला कवटाळावेसे का वाटले, हा प्रश्न खरोखर अनुत्तरितच राहिला.
3. ताज इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंटप्रमाणेच शहरातील एका हॉटेलमध्ये, चहाच्या लहान टपरीवर, बीबी- का- मकबरा, गोगाबाबा टेकडी येथेही या चित्रपटाचे शूटिंग झाले होते. त्याचप्रमाणे अभिनेत्री कायरा हिच्यासोबत रिक्षातून शहरात फेरफटका मारणाऱ्या काही दृश्यांचे चित्रीकरणही त्यावेळी झाले होते.