छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आधी एक आणि काही तासांनी दुसरी टक्केवारी जाहीर केली. ही टक्केवारी वाढलेली होती. मतदानाची ही वाढीव टक्केवारी कुठून आली? असा सवाल शिवसेना (उद्धवसेना) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले. याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे, मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांची स्क्रिप्ट वाचू नये, असेही त्या म्हणाल्या.
सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेतसंवाद साधला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, अशोक पटवर्धन, राजू वैद्य, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी उपस्थित होते. निवडणूक आयोगाने पक्षपात न करता तातडीने तक्रार दाखल करून घेतली पाहिजे. मुख्यमंत्री यांचा गृहपाठ कोण करतो, असाही सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.