औरंगाबाद: शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ असून आ. संजय शिरसाट परतीच्या वाटेवर आहेत, ते उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच परतील असा दावा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी करत आज खळबळ उडवून दिली. जळगाव येथील पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी हा दावा केला. यावर आता आ. संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली असून आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भावाबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल बहिण सुषमा अंधारे यांचे आभारही त्यांनी मानले.
मंत्रीमंडळ विस्तारात औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नाही. तेव्हा पासून त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु आहेत. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जळगावात एक दावा करून खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटातील आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून, अनेकजण परतीच्या वाटेवर आहेत. त्यात आमदार संजय शिरसाठ आघाडीवर असून, ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. अनेकांना मंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतरही, त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवल्याने आता शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही अंधारे यांनी सांगितले. यामुळे आ. शिरसाट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
या दाव्यावर आ. शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी नाराज नाही. लाचार, मजबूर होणार नाही. सामुहिक निर्णयातून शिंदे यांच्यासोबत आम्ही गेलो आहोत. अंधारे यांच्याकडे चुकीची माहिती गेलेली आहे. याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घाई गडबडीत होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य वेळी निर्णय घेतील, असेही आ. शिरसाट म्हणाले.