चेतन धनुरे। लोकमत न्यूज नेटवर्कउदगीर : महावितरणच्या देवणी विभागात कार्यरत असताना तब्बल ५५७ ग्राहकांच्या वीज बिल देयके दुरुस्तीत गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवत लातूरच्या अधीक्षक अभियंत्यांनी तत्कालीन उपकार्यकारी अभियंता कैलास मोहिते व सध्या सहायक लेखापाल म्हणून परळी विभागात कार्र्यरत असलेल्या विष्णू चाटे यांना सोमवारी निलंबित केले आहे़ ‘लोकमत’ने हे गैरकृत्य एका वृत्तमालिकेद्वारे काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आणले होते़देवणी विभागात कार्यरत असताना उपकार्यकारी अभियंता कैलास मोहिते व तत्कालीन वरिष्ठ लिपीक विष्णू चाटे यांनी विभागातील ५५७ ग्राहकांच्या वीज बिल देयकांची तब्बल ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपयांची ‘अॅडजस्टमेंट’ करुन देत ती कमीकेली होती़ परंतु ही प्रक्रिया राबविताना महावितरणने घालून दिलेल्या नियमावलींचे पालन करण्यात आले नव्हते़ हा प्रकार ‘लोकमत’मधून एका वृत्तमालिकेद्वारे चव्हाट्यावर आणण्यात आला होता़ हे प्रकरण महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम बुरुड यांनी गांभिर्याने घेत चौकशीचे आदेश दिले होते़ मंडळ कार्यालयाच्या वतीने गठित करण्यात आलेल्या समितीने या प्रकाराची चौकशी करुन अहवाल सादर केला़ त्यात देवणीचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता कैलास मोहिते व वरिष्ठ लिपीक विष्णू चाटे यांच्यावर गैरकृत्याचा ठपका ठेवला आहे़ मोहिते यांनी त्यांच्या कार्यकाळात कंपनीच्या नियमांचे पालन न करता देवणी विभागातील दुरुस्तीस पात्र नसलेल्या ५५७ ग्राहकांचे ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपये कमी केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे़ ५५६ पैकी ५४१ ग्राहकांचे स्वत: मोहिते यांनी तर १६ ग्राहकांचे चाटे यांनी दुरुस्ती प्रस्ताव सादर करुन ते बेकायदेशीररीत्या मंजूर करीत कंपनीची ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपयांची फसवणूक केल्याचेही आदेशात म्हटले आहे़ यानुषंगाने मोहिते व चाटे या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे़ या आदेशावर अधीक्षक अभियंता सचिन तालेवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़कैलास मोहिते हे सध्या ठाणे शहर मंडळ कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत़ त्यांना निलंबन काळात भांडुपच्या कार्यकारी अभियंत्यांकडे आठवड्यातून तीन दिवस हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ तर सध्या परळी उपविभागात सहायक लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या चाटे यांना अंबाजोगाई विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे हजेरी देण्याचे आदेशित केले आहे़
अभियंता, सहायक लेखापाल निलंबित
By admin | Published: May 31, 2017 12:34 AM