लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील शहर अभियंता सखाराम पानझडे, डॉ. बी. एस. नाईकवाडे आणि शाखा अभियंता आर.पी. वाघमारे यांच्यावर एक वर्षापूर्वी निलंबनाची प्रशासकीय कारवाई करण्यात आली होती. निलंबित अधिकाºयांच्या बाबतीत मनपा आयुक्तांनी आपल्या अखत्यारित निर्णय घ्यावा, असे आदेश शासनाने अलीकडेच दिले होते. या आधारावर शुक्रवारी आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी निलंबित अधिकाºयांना चौकशीच्या अधीन ठेवत परत कामावर घेतले. सकाळीच सर्व अधिकारी कामावर हजरही झाले.शहर अभियंता पानझडे यांच्यावर ८ सप्टेंबर २०१६ रोजी निलंबनाची कारवाई केली होती. सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात रेणू या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. २४ तासांमध्ये तिन्ही बछडे मरण पावले होते. तत्कालीन आयुक्तांनी बछड्यांच्या मृत्यूस प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडेच दोषी आहेत, म्हणून त्यांच्यावर २७ मार्च २०१६ रोजी निलंबनाची कारवाई केली. दीड वर्ष त्यांना निलंबित राहावे लागले. नगररचना विभागातील शाखा अभियंता आर.पी. वाघमारे यांना चुकीचा डी.टी.आर. दिल्याचा ठपका ठेवत १८ एप्रिल २०१६ रोजी निलंबित केले होते.शुक्रवारी शहर अभियंता पानझडे, डॉ. नाईकवाडे आणि वाघमारे यांना मनपा सेवेत रुजू करून घेण्यात आले. नगररचना सहसंचालक डी.पी. कुलकर्णी यांनाही टी.डी.आर. घोटाळ्यात निलंबित करण्यात आले. त्यांच्याही निलंबनाचा निर्णय प्रलंबित आहे.
निलंबित अधिकारी महापालिकेच्या सेवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:45 AM