औरंगाबाद : रेशन कार्ड वाटपातील गैरव्यवहारप्रकरणी निलंबित नायब तहसीलदार नामदेव देशटवाड यांच्या २८ वर्षीय मुलाने पोलिसांचा छळ व मित्र - मैत्रिणींकडून सातत्याने होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री १०.३० वाजता ही घटना उघडकीस आली.
साहेबराव नामदेव देशटवाड (रा. मयूरपार्क) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पैठणचे पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ, उपनिरीक्षक सागडे, हर्सूल ठाण्याचे निरीक्षक इंगोले, तहसीलदार किशोर देशमुख व अन्य जबाबदार कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवध व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत साहेबराव याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताचा भाऊ व आईने घेतल्यामुळे घाटीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृताच्या भावाने या आशयाची तक्रार आज हर्सूल ठाण्यात दिली आहे. मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, शनिवारी रात्री साहेबरावने साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी साहेबरावचे वडील पैठण येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांच्यावर रेशन कार्ड गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला. सध्या ते निलंबित आहेत. याचा तपास पैठण पोलीस करीत असून, १२ सप्टेंबरला उपनिरीक्षक मुठाळ हे दोन कर्मचाऱ्यांसह देशटवाड यांच्या मयूरपार्क येथील घरी आले व त्यांनी देशटवाड यांची पत्नी व मुलांना अपमानित केले. साहेबरावच्या आईला बाथरूममधून पोलिसांनी हात धरून ओढले. मुठाळ यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज साहेबरावने १३ व १६ सप्टेंबरला हर्सूल ठाण्यात दिला होता.
साहेबरावने लिहिली २४ पानांची सुसाईड नोटमयत साहेबराव याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, ती तरुणी तिच्या अन्य मित्रांच्या माध्यमातून साहेबरावला सतत पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करीत होती. या सर्व घटना मयत साहेबरावने एका डायरीमध्ये लिहून ठेवल्या असून, जवळपास २४ पानांची ही सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामध्ये ब्लॅकमेलिंग करणारी मैत्रीण, तिच्या तीन-चार मित्रांची नावे याशिवाय वडिलांसोबत आरोपी असलेल्या तहसीलदाराचे व पैठण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाच्या नावाचा उल्लेख आहे.