राम शिनगारे
औरंगाबाद - दोन दिवसांपूर्वी दोघांना आकाशवाणी चौकात मध्यरात्री निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केली होती. त्यात वादग्रस्त पोलीस कर्मचारी साहेबराव इखारे याच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणात आता इखारे याने शाळेत दिलेल्या माहिती अधिकाराचा अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून सात जणांनी मारहाण केल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.
साहेबराव बाबूराव इखारे (रा. कैलासनगर) हा ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. त्याने यापूर्वी गणेश विसर्जनाच्या दिवशी वर्दीवर असलेल्या क्रांती चौक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली होती. त्याच्यावर क्रांती चौक ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळ्याचा गुन्हा नोंदविल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी त्यास निलंबित केले. २६ सप्टेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास मयूर सोळंके हा विद्यार्थी आकाशवाणी सिग्नलजवळ भावासह आला असता, तेव्हा दोघांना साहेबराव इखारे, पंकज पाटील, रवी चंद्रकांत जाधव (रा. सर्व कैलासनगर) यांनी मारहाण केली. या प्रकरणी इखारेसह तिघांवर जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आता साहेबराव इखारे यानेदेखील जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इखारे याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या मित्राने राष्ट्रीय विद्यालय प्रा. शाळा, कैलासनगर, येथे माहिती अधिकाराचा अर्ज दिला होता. हा अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून प्रसाद अकोलकर (रा. रोकडिया हनुमान कॉलनी), दादू मारगुडे (रा. राजा बाजार), मयूर सोळंके, भंडारी, अजय इंगळे (तिघे रा. नारळीबाग) आणि अन्य दोघे अशा सात जणांनी साहेबराव इखारे आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.