ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 21 - दोन दिवसापूर्वी पकडलेले भंगाराचे ट्रक सोडून देण्यासाठी तब्बल ८ लाख रुपयांची मागणी करून दीड लाख रुपयांची तडजोड करणाऱ्या एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या प्रमुखसह दोन फौजदारांना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी बुधवारी तडकाफडकी निलंबित केले. या कारवाईमुळे पोलीस दलातील खाबुगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली .एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत आणि पोलीस उपनिरीक्षक ताहेर शेख अशी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले की, या अधिकाऱ्यांनी भंगारची वाहतूक करणारी दोन ट्रक १९ जूनला पकडले होते. हे ट्रक पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करण्यात आले. ही नोंद स्टेशन डायरीत त्यांनी केली नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांनी ट्रक सोडण्यासाठी आठ लाख रुपयांची मागणी केली. ऐवढी रक्कम आपण देऊ शकत नाही, असे चालकांनी स्पष्ट केले. तसेच एमआयडीसीतून भंगार उचलणाऱ्या कंत्राटदाराला याविषयी माहिती दिली. कंत्राटदाराने ठाण्याचे एपीआय राजपूत आणि उपनिरीक्षक शेख यांची भेट घेतली आणि त्यांना ट्रक सोडण्याची विनंती केली. या अधिकाऱ्यांनी त्यांनाही आठ लाख रुपये मागितले. ही मोठी रक्कम देण्यास त्यांनीही असमर्थता व्यक्त केल्याने शेवटी प्रकरण तडजोडीवर आले. तडजोडीअंती दिड लाख रुपयात व्यवहार ठरला. परंतु कंत्राटदाराने पोलिसाकडून सुरू असलेल्या अडवणुकीची तक्रार पोलीस आयुक्ताकडे केली. या तक्रारीची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली आणि चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांना दिले. अहवाल येताच निलंबनपोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली. हे प्रकरण दडपण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी जप्त ट्रकची स्टेशन डायरीला नोंद केली नाही. शिवाय कायदेशीर कारवाई केली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे तक्रारदाराच्या म्हणण्यात तथ्य असल्याचा अहवाल त्यांनी दिला. अहवाल येताच आयुक्तांनी राजपूत आणि शेख यांना तडकाफडकी निलंबित केले.
आठ लाखाची मागणी करणारे दोन पोलीस अधिकारी निलंबित
By admin | Published: June 21, 2017 6:54 PM