औरंगाबाद : हर्सूल येथे दीडशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पुणे येथील पी.एस. जाधव या खाजगी कंपनीला काम देण्यात आले. या कामाच्या मंजुरीसाठी माहापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला. मागील दोन महिन्यांपासून प्रस्ताव स्थायी समितीमध्ये रखडला आहे. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय स्थगित करण्यात आला.
जाधव यांची कंपनी अहमदनगर येथे 100 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करीत आहे. या कंपनीने बोगस खत तयार केल्याचा आरोप असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मनपा प्रशासनाने कोणतीही खातरजमा न करता कोट्यावधी रुपये खर्च करून कंपनीला काम देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश सभापती जयश्री कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिले.