लासूर स्टेशन (औरंगाबाद) : लासूर स्टेशनच्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या पाच पोलिसांनी कामात कसूर केला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले, तर एक पोलीस मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सोनवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आल्याने कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांची नावे रात्री उशिरापर्यंत कळू शकली नाहीत.
लासूर स्टेशन येथे गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून व दरोड्यांच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर लागावा म्हणून वरिष्ठ पातळीवरून सूत्र हलविले जात आहे. तसेच अधिवेशनात आ. सुभाष झांबड यांनी याप्रकरणी लक्षवेधी मांडली होती. त्या अनुषंगाने येथे अविनाश सोनवणे यांची विशेष उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोनवणे यांनी सूत्रे हाती घेताच त्यांनी स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामातील उणिवा शोधून त्यावर अक्षरश: हल्लाच चढवला आहे. लासूर स्टेशन येथे पुन्हा चोरी व खुनाच्या घटना घडू नयेत म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून त्यांची ठराविक ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.
विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा दणकासोनवणे रात्रीची गस्त घालत असताना पाच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर व काही झोपलेले आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई तर एक पोलीस मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याने त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सोनवणे यांना विचारले असता, याविषयी नंतर सविस्तरपणे बोलतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या धडाकेबाज कारवाईचे लासूर स्टेशन येथे स्वागत होत आहे.