औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू शोधसमितीने २७ उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पाच उमेदवारांची नावे राज्यपालांकडे सादर केली. मुलाखती संपून तीन दिवस उलटले तरी अद्याप एकाही उमेदवारास राजभवनातून बोलावणे आले नाही. त्यामुळे कुलगुरू कोण हा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. असे असले तरी ३ जून रोजी राज्यपाल त्या टॉप फाईव्ह उमेदवारांशी संवाद साधणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. कुलगुरू शोधसमितीने पाच उमेदवारांची नावे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे सादर केली आहेत. या पाच उमेदवारांपैकी एका जणाची कुलगुरूपदी निवड करण्यापूर्वी राज्यपाल हे ३ जून रोजी त्या पाच जणांशी संवाद साधणार असल्याचे सूत्राने सांगितले. मात्र, हे पाच उमेदवार कोण आहेत, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे पाच जणांच्या यादीत आपलेच नाव आहे, याबाबत सर्वच उमेदवार ठाम आहेत. कुलगुरूपदासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सात तज्ज्ञ प्राध्यापकांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी एक उमेदवार वगळता सर्वच उमेदवार औरंगाबादला परतले आहेत. पाच उमेदवारांशी राज्यपाल वन टू वन चर्चा करणार आहेत. विद्यापीठ आणि उच्च शिक्षणाबद्दलच्या त्यांच्या संकल्पना ते जाणून घेतील. तसेच त्यानंतर ते कुलगुरूपदी एका तज्ज्ञाची निवड करतील. पाच उमेदवारांना राजभवनातून दोन दिवसांत बोलावणे येऊ शकतो. मात्र, या पाच जणांमध्ये औरंगाबादेतील कोणाचा समावेश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुलगुरू पदाचे सस्पेन्स कायम
By admin | Published: June 01, 2014 12:38 AM