औरंगाबाद : मुलीचे बरे-वाईट केल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी तिच्या सासरी राडा केल्याची घटना सोमवारी रात्री शिवाजीनगर येथे घडली. या घटनेत दोन्ही गटांचे ५ जण जखमी झाले असून, त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही गटाच्या काही जणांना ताब्यात घेतले.
शिवाजीनगर येथील उत्तम चव्हाण यांचा प्राध्यापक मुलगा राजेशचे लग्न गिरनेर तांडा येथील राठोड कुटुंबातील मुलीसोबत झाला होता. राजेश यांची पत्नी डीएडचे शिक्षण घेत आहे. लग्न झाल्यापासून राजेश आणि त्याच्या कुटुंबाकडून मुलीला नीट वागणूक मिळत नाही. ते तिला सतत त्रास देतात. यावरून दोन्ही कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी डीएड कॉलेजला जाते असे सांगून राजेश यांची पत्नी घरातून बाहेर पडली. ती सायंकाळी घरी परतली नाही. यामुळे चव्हाण कुटुंबाने तिच्या माहेरी फोन करून ती तिकडे आली का, याबाबत विचारणा केली. ती माहेरी आली नव्हती.
यामुळे आपल्या विवाहित मुलीचे सासरच्या मंडळींनी बरे-वाईट केले. त्यांनीच तिला गायब केले, असा आरोप करीत मुलीचे नातेवाईक उत्तम चव्हाण, त्यांची पत्नी शशिकला, मुलगा राजेश आणि अक्षय यांच्या घरी गेले. यावेळी दोन्ही गटाचे शंभर लोक तेथे जमले होते. त्यांच्यात झालेल्या हाणामारीत दोन्ही गटाचे पाच जण जखमी झाले. चव्हाण कुटुंबाला सिग्मा रुग्णालयात, तर राठोड कुटुंबातील जखमींना घाटीत दाखल केले. रात्री उशिरापर्यंत पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.