औरंगाबाद : ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या ७१३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ५४०८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी प्राप्त अहवालातून शनिवारी औरंगाबाद व सिल्लोड तालुक्यातून प्रत्येकी एक शिक्षक पाॅझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ११ झाली आहे, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा, महाविद्यालयांची संख्या ८२४ आहे. त्यातील ७१३० शिक्षकांची सोमवारपूर्वी तपासणीसाठी नऊ तालुक्यांत तपासण्या सुरू असून शनिवारी सायंकाळपर्यंत ५४०८ जणांचे स्वॅब आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी विषाणू तपासणी व संशोधन प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून तीन दिवसांत ११ जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. हे प्रमाण अत्यल्प असल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, तर रविवारी उर्वरित १७२२ तपासण्या पूर्ण होतील, अशी माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.
--
सोमवारपूर्वी तपासण्या पूर्ण
ग्रामीणच्या शिक्षकांच्या तपासण्यांना प्राधान्य दिले जात आहे, तर घाटीत आणखी एक यंत्र कार्यान्वित झाल्याने घाटीची तपासणी क्षमता २२५० पेक्षा अधिक झाली आहे, तर विद्यापीठातील प्रयोगशाळेची क्षमता एक हजार, अशी ३ हजार २०० तपासणीची क्षमता असल्याने सोमवारपर्यंत सर्व शिक्षकांच्या तपासण्या पूर्ण होतील असा विश्वास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.