औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्र शासनाचे पथक नुकतेच शहरात दाखल झाले होते. या पथकातील सदस्यांनी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत न घेता, स्वतःच पाहणी केली. जे हवे ते पाहून केंद्रीय पथक परत गेले. त्यामुळे महापालिकेची धाकधुक आता वाढली आहे. गेल्यावर्षी देशभरात २६ वा, तर राज्यस्तरावर ८ वा क्रमांक मिळाला होता. यंदा महापालिकेची कोणतीही तयारी नसल्यामुळे क्रमवारी घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र शासनाच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने सर्वेक्षण केले. सुरुवातीला या पथकातील एकच सदस्य आला. दुसरा सदस्य येणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण एकाच सदस्याने सर्वेक्षण केले आणि तो निघून गेला. या सदस्याने महापालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती घेतली. त्या सदस्याने ‘ओडीएफ’ ( ओपन डिफीकेशन फ्री) वर लक्ष केंद्रित केले. ज्या ज्या भागात लोकं ‘उघड्यावर’ बसतात, त्या भागात जाऊन त्या सदस्याने तेथील नागरिकांशी संवाद साधला. तुम्ही वैयक्तिक स्वच्छतागृह का वापरत नाही, वैयक्तिक स्वच्छतागृहासाठी पालिकेने कशी आणि किती मदत केली आहे, असे प्रश्न त्यांनी विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्वच्छतागृहाचा वापर कसा करणार? महापालिकेकडून पाचव्या दिवशी, तर कधी आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. अनेक वसाहतींमध्ये तर टँकरने पाणी देण्यात येते. टँकरचे पाणी पिण्यासाठीच वापरले जाते. त्यामुळे आम्ही ‘उघड्यावरच’ जातो, असे नागरिकांनी पथकाला सांगितले. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था त्याने पाहिली.
स्वच्छतेच्या कामाचा बोजवारास्वच्छतेसाठी रेड्डी कंपनीचे कर्मचारी ज्या वसाहतींमध्ये जात नाहीत, त्या वसाहतींमध्ये जाऊन त्या सदस्याने स्वच्छतेच्या कामाची पाहणी केली. महापालिकेने कागदावर शहर स्वच्छ व सुंदर केले असले तरी, प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, हे केंद्रीय पथकाने बघितले.
एसटीपीची पाहणीकेंद्रीय पथकातील सदस्याने महापालिकेच्या कांचनवाडी, झाल्टा, सलीम अली सरोवर या ठिकाणच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टला भेट दिली. तेथील कामकाज समजावून घेतले. एसटीपीच्या कामाबद्दल मात्र त्या सदस्याने समाधान व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.