छत्रपती संभाजीनगर : ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी नुकताच समाजकल्याण विभागाकडे आठ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तथापि, त्रुटीची पूर्तता केलेल्या पूर्वीच्या विद्यार्थ्यांना या निधीतून शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार असल्यामुळे याही वेळी गेल्या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
लाभार्थी विद्यार्थ्यांच्या तुलनेत अपुरा निधी प्राप्त होत असल्यामुळे शिष्यवृतीचे वाटप टप्प्याटप्प्याने करावे लागत असल्याचे समाजकल्याण विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. दहावीनंतर व्यावसायिक, बिगरव्यासायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती लागू आहे. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्त्यापोटी ५१ हजार रुपये दिले जातात.
पुणे, मुंबईनंतर हा जिल्हा शैक्षणिक हब म्हणून ओळखला जातो. येथे राज्यभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तुलनेने शासकीय वसतिगृहांची संख्या व प्रवेशक्षमता पुरेशी नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ नये, यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे. परंतु, पात्र विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत या शिष्यवृत्तीसाठी अपुरा निधी येत असल्यामुळे सन २०२०-२१ पासूनचे काही विद्यार्थी लाभापासून लटकले आहेत.
अलीकडेच आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ या वर्षांतील विद्यार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केली आहे. अशा सुमारे ११०० आणि सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील सुमारे ५०० अशा एकूण १६०० विद्यार्थ्यांना या निधीतून शिष्यवृत्तीचे वितरण केले जाणार आहे. मागच्या वर्षातील उर्वरित सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.
‘स्वाधार’कडेच विद्यार्थ्यांचा ओढाशासकीय वसतिगृहातील गैरसोयींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा स्वाधार शिष्यवृत्तीकडेच आहे. ‘स्वाधार’साठी बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले होते. आता या शिष्यवृत्तीसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे वसतिगृहापासून वंचित राहणारेच विद्यार्थी ‘स्वाधार’साठी ग्राह्य धरले जाणार आहेत.