औरंगाबाद : स्वप्नील चव्हाणच्या झुंजार शतकी खेळीनंतरही औरंगाबादला पुणे येथे मंगळवारी झालेल्या एमसीएच्या सीनिअर सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य केडन्स संघाविरुद्ध एक डाव आणि १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. औरंगाबादची दुसऱ्या डावात भक्कम स्थिती असताना एकाच षटकात तीन बळी घेणारा सिद्धेश वरघंटे हा केडन्स संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.केडन्सने औरंगाबादचा पहिला डाव अवघ्या ७५ धावांत गुंडाळताना प्रत्युत्तरात ९ बाद ३७३ धावांवर त्यांचा दुसरा डाव घोषित करीत पहिल्या डावात २९८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर स्वप्नील चव्हाण याने स्वत:ला बढती देत सलामीला येण्याचा निर्णय घेत आक्रमण आणि बचाव याचा सुरेख समन्वय साधत कर्णधाराला साजेशी खेळी केली. स्वप्नीलने मधुर पटेल याच्या साथीने ८ षटकांत ५३ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मधुर पटेल बाद झाल्यानंतर आॅफस्पिनर सिद्धेश वरघंटे याला लाँगआॅफ आणि मिडविकेटला टोलेजंग षटकार ठोकणाºया स्वप्नील चव्हाण याने प्रज्वल घोडकेच्या साथीने दुसºया गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी रचली. प्रज्वल तंबूत परतल्यानंतर अक्षय वाईकर याला लाँगआॅफला उत्तुंग षटकार ठोकणाºया राहुल शर्माने स्वप्नील चव्हाणला साथ दिली. लेगस्पिनर पारस रत्नपारखी याला लाँगआॅफ आणि लाँगआॅनला गगनभेदी षटकार ठोकणाºया स्वप्नीलने नंतर रणजीपटू समद फल्लाह याला डावाच्या ४५ व्या षटकात नेत्रदीपक असा फ्लिकचा चौकार आणि याच षटकात २ धावा घेत १२१ चेंडूंत शतक पूर्ण केले.स्वप्नीलच्या जिगरबाज खेळीने औरंगाबादचा संघ पराभव टाळणार अशीच परिस्थिती होती; परंतु सिद्धेश वरघंटे याने त्याच्या एकाच षटकात स्वप्नील चव्हाण व प्रवीण क्षीरसागर यांना सलग चेंडूंवर व अखेरच्या चेंडूवर संदीप सहानी याला बाद करीत सामन्याला कलाटणी देणारा स्पेल टाकत केडन्सला निर्णायक विजय मिळवून दिला. औरंगाबादचा संघ दुसºया डावात २८५ धावांवर सर्वबाद झाला. औरंगाबादकडून स्वप्नील चव्हाण याने कर्णधाराला साजेशी खेळी करताना १४६ चेंडूंत १४ खणखणीत चौकार आणि ४ टोलेजंग षटकारांसह १२३ धावांची नेत्रदीपक खेळी केली. त्याला साथ देणाºया राहुल शर्माने ५६ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ३0, नितीन फुलाने याने २६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३0, प्रज्वल घोडेकेने २८, मधुर पटेलने २१ चेंडूंत ५ चौकारांसह २३ व विश्वजित राजपूतने २0 धावांचे योगदान दिले. केडन्स संघाकडून सिद्धेश वरघंटेने ५0 धावांत ४ गडी बाद केले. त्याला समद फल्लाह, अक्षय वाईकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली.संक्षिप्त धावफलकऔरंगाबाद पहिला डाव : २५.३ षटकांत सर्वबाद ७५. (सूरज सुलाने १४, स्वप्नील चव्हाण १२, सचिन लव्हेरा १२. अक्षय वाईकर ६/१९, नितीश सालेकर ३/२२).दुसरा डाव : ५८.१ षटकांत सर्वबाद २८५. (स्वप्नील चव्हाण १२३, राहुल शर्मा ३0, नितीन फुलाने नाबाद ३0, प्रज्वल घोडके २८, मधुर पटेल २३. सिद्धेश वरघंटे ४/५0, समद फल्लाह २/५४).केडन्स : पहिला डाव ६३.१ षटकांत ९ बाद ३७३ (घोषित) (हर्षद खडीवाले १२१, निखिल पराडकर ६९, सिद्धेश वरघंटे ६८. राहुल शर्मा ५/१0५, प्रवीण क्षीरसागर २/७0, स्वप्नील चव्हाण २/९८).
स्वप्नीलचे झुंजार शतक, औरंगाबाद पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:56 AM