वाळूज महानगर : थकीत वेतनासाठी सफाई कामगारांनी कचरा संकलनाचे काम दोन दिवसांपासून बंद केल्याने सिडको वाळूज महानगरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सिडको प्रशासनाकडून नवीन निविदा मंजूर होईपर्यंत कचरा संकलनाचे काम पुन्हा जुन्या ठेकेदाराकडे सोपविल्याने गुरुवारपासून कचरा संकलनास सुरुवात करण्यात आली.
सिडको वाळूज महानगरातील कचरा संकलन करण्यासाठी निविदा पद्धतीने आर.डी.पेस्ट कंट्रोल या संस्थेच्या ठेकेदाराकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संस्थेमार्फत परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी ठेकेदाराने कंत्राटी पद्धतीने ४५ मजुरांची नियुक्ती केली असून, स्वच्छता केल्यानंतर १० घंटागाड्यातून या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येते. या सफाई कर्मचाऱ्यांनी ९ हजारांच्या आसपास वेतन दिले जाते; मात्र कचरा संकलनाचा करार मार्च महिन्यात संपल्याने सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. थकीत वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून कचरा संकलनाचे काम बंद केले होते. कचरा संकलन बंद झाल्याने तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, नरेंद्र यादव व त्रस्त नागरिकांनी सिडको प्रशासक व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.
सिडको प्रशासनातर्फे आजपासून कचरा संकलन
या विषयी सिडकोचे सहायक वसाहत अधिकारी गजानन साटोटे म्हणाले की, कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराची मुदत मार्च महिन्यात संपलेली असून, नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. कचरा संकलन करणाऱ्या संस्थेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन थकीत असून, ठेकेदाराला लवकरच वेतनाची रक्कम अदा केली जाणार आहे. नवीन निविदा मंजूर होईपर्यंत याच संस्थेमार्फत गुरुवारपासून कचरा संकलनाचे काम पुन्हा सुरु करण्यात आल्याचे सांगितले.
फोटो ओळ
सिडको वाळूज महानगरात कचरा संकलनाचे काम ठप्प पडल्याने नागरिक उघड्यावर कचऱ्याची विल्हेवाट लावत आहेत.