अनिल मेहेत्रे
पाचोड : कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी येण्यास सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. अतिवृष्टीमुळे आवक घटल्याने चांगल्या दर्जाची मोसंबी बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे उत्कृष्ट प्रतीच्या मोसंबीला साधारण २० ते ३० हजार रूपये प्रतिटन दर मिळत आहे.
यातून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न येत असून सध्या मोसंबी मार्केटमध्ये दीडशे ते दोनशे टन मोसंबी शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत. पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये आंबेबहार खरेदीसाठी दोन महिन्यांपुर्वी सुरूवात झाली. स. ११ वा. व्यापारी जमा झाल्यानंतर माेसंबी विक्रीसाठी बोली सुरू होते. सध्या आवक कमी असल्याने चांगल्या प्रतीच्या मोसंबीला २० ते ३० हजार रूपये दर मिळत असून महिन्याभरापुर्वी हाच भाव १५ ते २० हजारांच्या घरात होता.
राज्यासह बाहेर ठिकाणांहूनही व्यापारी मोसंबीच्या खरेदीसाठी परिसरात येत आहेत. परिसरातील बहुतांश शेतकरी आपली मोसंबी विक्रीसाठी आणत आहेत. स्थानिक पातळीवर चांगला भाव मिळत असून वाहतूक खर्चसुद्धा कमी लागत असल्याने शेतकरी पाचोडच्या माेसंबी मार्केटला प्राधान्य देत आहेत. या मोसंब्यांना मुंबई, आंध्र प्रदेश, कोलकाता, बिहार, दिल्ली येथून चांगली मागणी आहे.