औरंगाबाद : ऐनसणासुद्धीच्या दिवसांत मिठाई विक्रेत्यांनी विविध मिठाईचे भाव वाढविले आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी मिठाईची गोडी फिक्की झाली आहे. या भाववाढीसाठी साखर, दूध, कच्चामाल तसेच डिझेलच्या भावात झालेली वाढ कारणीभूत असल्याचे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गत वर्षभरात महागाईने सर्वसामान्य ग्राहक होरपळून निघाला आहे. आता महागाईचे पाणी डोक्यावरुन वाहू लागले आहे. सणासुदीचे दिवस आहेत. मिठाईला मागणी वाढत असताना दुसरीकडे किलोमागे २० ते ४० रुपयांनी मिठाईचे भाव वाढविण्यात आले आहे.
दूध, खव्यापासून तयार करण्यात आलेल्या मिठाईच्या किंमती सर्वाधिक वाढल्या आहेत. यात पेढा, बर्फी, बालूशाही, गुलाबजामून आदी मिठाईचा समावेश आहे.
चौकट
मिठाईचे दर (प्रतिकिलो)
मिठाईचे नाव सध्याचे दर गणेशोत्सआधीचे दर
दूधपेढा ५०० रु. ४८० रु.
केशर बर्फी ५०० रु. ५२० रु.
कलाकंद ४८० रु. ५०० रु.
रसमलाई ४०० रु. ४४० रु
------
चौकट
का वाढले दर ?
मिठाई तयार करण्यासाठी दूध, साखर लागते. दूध लिटरमागे ३ ते ४ रुपयांनी महागले. सध्या ६० ते ६४ रुपये लिटरने दूध मिळत आहे. साखरचे भाव ४ रुपयाने वधारून ४० रुपये किलो झाले आहे. भट्टीसाठी डिझेल लागते ते आता ९९ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे नाईलाजाने मिठाईचे दर किलोमागे २० ते ४० रुपयांनी वाढवावे लागले.
राजेंद्र पवार
मिठाई विक्रेते
---
दूध, साखर, डिझेलचे भाव वाढले तसेच कारागिरांची मजुरी वाढली आहे. यासर्वांचा परिणाम मिठाईच्या किमतीवर होत आहे. मात्र, छावणीत कामगार, रोजंदारीने काम करणारा वर्ग जास्त असल्याने व तोच ग्राहक जास्त प्रमाणात असल्याने आम्ही भाववाढ केली नाही. नफा कमी झाला पण ग्राहक टिकवून ठेवला.
दिनेश कच्छवा
मिठाई विक्रेता
--
दरांवर नियंत्रण कोणाचे ?
मिठाईच्या दरावर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. अन्न व औषधविभाग फक्त गुणवता तपासणी करीत असते. कच्चामालाचे भाव वाढले की, शहरातील मिठाई विक्रेते आपआपसात ठरवून वाढ करतात.
---
भेसळीकडे लक्ष असू द्या
१) शहरात अनेक मिठाई विक्रेते स्वत: खवा तयार करतात व खव्याचे पेढे व अन्य मिठाई बनवितात.
२) मात्र, परप्रांतातून खवा आणून येथे मिठाई तयार करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. खव्याची गुणवत्ता अनेकदा चांगली नसते.
३) अनेकदा पोत्यात टाकून खवा आणला जातो. त्याची गुणवत्ता खराब होते. सणासुदीत मागणी वाढल्याने भेसळयुक्त खवा परराज्यातून जास्त प्रमाणात मागविला जात असतो.
---
चौकट
ग्राहक म्हणतात
आधीच महागाईचे पाणी डोक्यावरून चालले आहे. त्यात आता मिठाई महागल्याने सणासुदीत गोड खाणेही आता परवडत नाही. किलोमागे २० ते ४० रुपये भाववाढ होणे सर्वसामान्यांना न परवडणारे आहे.
विलास तोडकर
ग्राहक, सिडको
---
आता महागाईची सवय झाली आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाचे भाववाढीने सर्वच महागले. त्यातून मिठाई कशी सुटणार. तसेही आम्ही सणाच्या दिवशी अर्धा ते एक किलो मिठाई खरेदी करतो.
आर्य माहेश्वरी
समर्थनगर
---