औरंगाबाद : एक वर्षाच्या स्थानबद्धतेची शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगार शेख इर्शाद शेख इब्राहिम (२६, रा. कटकटगेट परिसर) याने दारूसाठी एकावर धारदार तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली. ही घटना मध्यवर्ती जकातनाका परिसरात घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी सांगितले की, शरीफ कॉलनी येथील रहिवासी अनवर खान कादर खान (२३) आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ५ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अनवर हे त्यांचा भाचा शेख राज शेख मजहर याच्यासह मध्यवर्ती जकातनाका येथे पायी जात होते. त्यावेळी आरोपी इर्शाद याने आवाज देऊन त्यांना थांबविले. त्यानंतर त्याने जकातनाका येथील जनावरांचा दवाखाना येथे जाऊ असे त्यांना सांगितले. तेथे गेल्यानंतर आरोपीने अनवरकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. त्यावेळी अनवर यांनी त्यास पैसे नाही असे म्हणताच, आरोपीने त्यास शिवीगाळ करून मारहाण केली.
रमजान ईदसाठी मुलांचे कपडे घेण्यासाठी पैसे शिल्लक ठेवले असून, ते मी दारू पिण्यासाठी तुला देणार नाही, असे अनवर यांनी त्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने त्यांचा गळा धरून खाली पाडले आणि कमरेला खोसलेली तलवार बाहेर काढली. त्या तलवारीने पोटावर वार केला. मात्र, हा वार चुकविल्याने तो त्यांच्या डाव्या मांडीवर लागला, तर दुसरा वार डाव्या पायाच्या पोटरीवर केल्याने अनवर रक्तबंबाळ झाले. तुला जिवे मारून टाकतो, असे म्हणत पुन्हा वार करण्याच्या तयारीत इर्शाद असताना अनवर यांचा भाचा आणि मित्र शेख जाकेर हे धावत आले. त्यांनी आरडाओरड करताच आरोपी तेथून पळून गेला. या घटनेनंतर अनवर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी आरोपी इर्शादविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला.
खून, खुनाच्या प्रयत्नाचे यापूर्वी गुन्हेआरोपी इर्शादवर एका भाजी विक्रेत्याचा भोसकून खून करणे, साक्षीदारांच्या घरी जाऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तडीपारीनंतर पोलिसांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती. २० मे रोजी तो चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर कारागृहातून बाहेर आला आणि गुन्हा केला.