औरंगाबाद : हळदीच्या समारंभात तलवारी, जांबिया हातात धरून मित्रांसह बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवासह त्याच्या सहा मित्रांना पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लग्नात लागलेल्या हळदीच्या पिवळ्या हातात बेड्या पडल्यामुळे पुंडलिकनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
आराेपींमध्ये नवरदेव बिभीषण अनिल शिदे (२१ ), यश संजय साखरे (१९), शेख बादशाह शेख बाबा (२२), शुभम सुरेश मोरे (२२), किरण गोरख रोकडे (२२, सर्व रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) आणि आरटीओ एजंट वसीम अयुब शेख (२०, रा. लतीफनगर) यांचा समावेश आहे. पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी बिभीषण शिंदे याच्या हळदीचा कार्यक्रम रेणुकानगर परिसरात आयोजित केला होता. हा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा करण्यात येत असताना आरटीओ एजंट वसीम शेख याने तलवार आणि शुभम मोरे याने दोन जांबिया बाहेर काढले. तलवार म्यानातून काढून हातात उंच धरीत बेधुंदपणे नवरदेवासह इतर मित्र नाचू लागले.
या सर्व धिंगाण्याचे व्हिडिओ चित्रणही करण्यात आले. यानंतर काही वेळातच तलवार आणि जांबिया हातात घेऊन नाचत असतानाच व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड केले. हे व्हिडिओ दोन दिवसांत तुफान व्हायरल होत पुंडलिकनगर पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून निरीक्षक गांगुर्डे यांनी सहायक निरीक्षक शेषराव खटाणे यांच्या पथकाला संबंधितांना अटक करण्याचे निर्देश दिले. खटाणे, हवालदार लक्ष्मणराव हिंगे, बाळाराम चौरे, नाईक गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, गणेश डोईफोडे, संतोष पारधे यांच्या पथकाने सर्वांना अटक करीत शस्त्रे ताब्यात घेतली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास दादाराव राठोड करत आहेत.
मस्ती महागात पडलीहळदीच्या समारंभात मित्रांसह मस्ती करणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले. मित्रांच्या आग्रहामुळे नवरदेवही तलवार हातात घेऊन नाचताना व्हिडिओमध्ये दिसतो. त्यामुळे लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरदेवाला कारागृह पाहावे लागले आहे.