औरंगाबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीचौकातील अश्वारूढ पुतळा सर्वधर्म समभावाचा प्रतीक मानला जातो. ३५ वर्षांपूर्वी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते.
भावी पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठी २१ मे १९८३ रोजी क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. मागील ३४ वर्षांच्या काळात ज्या काही सामाजिक, राजकीय चळवळी झाल्या, तसेच शहराचा कायापालट झाला त्याचा साक्षीदार महाराजांचा पुतळा ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना समान न्याय्य वागणूक दिली. खर्या अर्थाने महाराजांनी त्यावेळी स्वराज्य निर्माण केले. महाराजांचा औरंगाबादेतील पुतळाही सर्वधर्म समभावाचा प्रतीक ठरला आहे. मराठवाड्याच्या राजधानीचे वैभव ठरलेल्या छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्याच्या पाठीमागेही शहरवासीयांनी केलेला २१ वर्षांचा पाठपुरावा हा सुद्धा एक इतिहास होय. पुतळा उभारण्यासाठी तेव्हा सर्व धर्मातील नागरिकांनी हातभार लावला होता. सर्व राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुतळा उभारण्यासाठी एकजूट दाखविली. पुतळ्याची उभारणी १९८३ मध्ये झाली असली तरीही तो उभारण्यासाठी १९६२ पासून प्रयत्न सुरू झाले होते. त्यावेळी शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील काही मंडळींनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरात पुतळा उभारण्याचा संकल्प केला होता. क्रांतीचौकात पुतळा उभारण्यासाठी व ते कार्य तडीस नेण्यासाठी १९८० पर्यंत या गोष्टींचा पाठपुरावा या मंडळींनी केला.
या काळात महाराजांचा पुतळा उभारण्याच्या कल्पनेला शहरवासीयांनी तेव्हा जोरदार पाठिंबा दिला होता. त्यावेळी नगरपालिकेने हे कार्य हाती घेऊन पूर्ण करावे यासाठी चोहोबाजूने मागणी केली होती. परिणती म्हणजे १९८१ मध्ये तत्कालीन ग्रामविकासमंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत पुतळा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कार्य जिल्हा परिषद व नगरपालिकेने संयुक्तपणे हाती घ्यावे, असे ठरले. नगराध्यक्ष अलफखाँ यांच्या अध्यक्षतेखाली अश्वारूढ शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची स्थापना करण्यात आली होती. सचिव म्हणून प्रकाश मुगदिया यांंची निवड करण्यात आली होती. तसेच समितीमध्ये केशवराव औताडे, जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबराव पाटील डोणगावकर, शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अशोक शहा आदींचा समावेश होता. २१ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर क्रांतीचौकात १९८३ मध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला.
एकतेचा संदेश राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, सर्व धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन १९८३ मध्ये महाराजांचा पुतळा क्रांतीचौकात उभारला. यातून शहरवासीयांनी सामाजिक एकता, सलोख्याचा संदेश दिला होता. उल्लेखनीय म्हणजे पुतळा उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते. त्यांना सर्व धर्मातील लोकांनी साथ दिली व शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्वप्न साकार झाले. - अशोक शहा, सामाजिक कार्यकर्ते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी1. मुंबईतील शिल्पकार एस. डी. साठे यांनी छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा तयार केला. 2. शिवरायांचा पुतळा १५ फूट उंच व ५ फूट रुंद.3. मुंबईहून ट्रकने ९ मे १९८३ रोजी शहरात पुतळा आणण्यात आला होता. 4. २१ मे १९८३ रोजी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते.