औरंगाबाद : महापालिकेला रेमडेसिविर या इंजेक्शन्सचा नव्याने झालेला पुरवठा रुग्णांसाठी त्रासदायक ठरतो आहे. या इंजेक्शनचा डोस दिल्यामुळे काही रुग्णांना थंडी-ताप येण्याची लक्षणे आढळून आली आहेत. इंजेक्शन देताना पालिका विशेष काळजी घेत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी दुपारी मनपा आरोग्य विभागाकडे २५० रेमडेसिविर इंजेक्शन्सची मागणी केली. ही इंजेक्शन्स उसनवारीतून काही खासगी हॉस्पिटल्सला द्यायची होती. सोमवारी इंजेक्शन्सचा पुरवठा न झाल्यामुळे मनपाकडे उपलब्ध असलेल्या इंजेक्शन्सपैकी काहींची मागणी जिल्हा प्रशासनाने केली. त्यावेळी आरोग्य विभागाकडून नव्याने आलेले इंजेक्शन रुग्णास दिल्यानंतर काही जणांमध्ये थंडी-ताप येण्याची लक्षणे आढळून आली आहेत. सध्या घाटी, सिव्हिल हॉस्पिटल आणि महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये कोरोना उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत आहे. सोमवारी पुरवठा न झाल्यामुळे खासगी हॉस्पिटल्सना मागणीनुसार इंजेक्शन देण्यासाठी मनपाकडे जिल्हा प्रशासनाने उसनवारी केली.
महापालिकेच्या आरोग्य अधिकारी म्हणाल्या...
यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, नव्याने पुरवठा केलेल्या इंजेक्शनमुळे काही रुग्णांमध्ये थंडी-ताप येण्याची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पालिका खबरदारी घेऊन त्याचा वापर करीत आहे. त्या इंजेक्शन्सचा किती स्टॉक आहे, ती कुठे वितरित केली याची माहिती घ्यावी लागेल. तसेच ती कोणत्या कंपनीची आहेत, हे देखील पाहावे लागेल.