- संतोष स्वामीदिंद्रुड (जि. बीड) : पारंपरिक शेतीला फाटा देत धारूर तालुक्यातील भोपा येथील एका तरुण शेतकऱ्याने दोन एकरांत पपई व टरबुजाची लागवड करीत तीन लाखांचे उत्पन्न कमावले आहे. यामुळे या युवकाची प्रयोगशील शेती इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
भोपा येथील रवी वाघचौरे या शेतकऱ्याने मे महिन्यात तायवान ७८६ या जातीच्या पपईची एक एकर परिसरात लागवड केली. सिरसाळा येथील मयंक गांधी यांच्या संस्थेच्या रोपवाटिकेतून पपईच्या रोपांची खरेदी केली. भेसळडोस, रोपलागवड, खत, खुरपणी, मजुरी, फवारणीवर जवळपास ९० हजारांचा खर्च एक एकर पिकांसाठी या शेतकऱ्याला लागला. ऑक्टोबर महिन्यापासून पपईचे पीक तोडणीला आले असून, जवळपास दोन लाखांचे उत्पन्न या लागवडीतून त्यांना मिळाले आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस टरबूज हे पीक एक एकर परिसरात रवी यांनी लावले होते. केवळ ६० दिवसांत ५० हजार रुपयांचा खर्च करून एक लाख रुपयांचे उत्पन्न या टरबुजाच्या पिकातून त्यांना मिळाले. मी माझ्या शेतीत सोयाबीन व कापूस लागवड करायचो. मात्र मित्र राजेभाऊ धुमाळ यांच्या मार्गदर्शनामुळे मी पपई व टरबूज या पिकांच्या लागवडीकडे वळलो. योग्य वेळी फवारणी, योग्य वेळी खतपाणी केल्यामुळे मला समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नगदी पिके घ्यावीत, असे आवाहन रवी वाघचौरे यांनी केले आहे.
पंजाब, बंगाल, दिल्लीतून मोठी मागणीआगामी काळात पपईचे तीन लाखांचे तर टरबुजास दीड लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा रवी वाघचौरे यांनी व्यक्त केली आहे. पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या बाजारपेठेत पपई व टरबुजाला चांगला भाव मिळत असून, या नगदी पिकांमुळे शेतकरी संतुष्ट आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पपईला २२, तर टरबुजाला १० रुपये किलोचा भावपपई व टरबुजाच्या पिकांसाठी हलकी ते मध्यम, पाणी निचरा होणारी जमीन लागते. जवळपास दोन ते अडीच किलो वजनाचे पपईचे फळ व पाच ते सहा किलोंचे टरबुजाचे एक फळ वाघचौरे यांच्या हाती लागले आहे. सद्य:स्थितीत पपईला २२ रुपयांचा, तर टरबुजास १० रुपयांचा प्रतिकिलो भाव मिळत आहे.
प्रगतिशील शेतीचा मार्ग योग्य नियोजनातूनशेतकऱ्याने नवनवीन पीकलागवड करताना रोगप्रतिकारक शक्ती असलेली, त्याचप्रमाणे समान वजनाची व लंबगोल, एकसारख्या आकाराची फळे देणाऱ्या हमीपात्र कंपनीच्या बियांची लागवड करणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळणे आवश्यक असून, प्रगतिशील शेतीचा मार्ग योग्य नियोजनातून साकारता येतो.- राजेभाऊ धुमाळ, कृषी सेवा केंद्र चालक, दिंद्रुड