छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाळूज, रांजणगाव व पंढरपुर येथील औद्योगिक वसाहतीच्या क्षेत्रात विविध प्रकारचे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रात त्यांनी शहर पोलिसांवर वसूलीचा आरोप केला आहे.
दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले की, संभाजीनगर शहरातील वाळूज, रांजणगाव आणि पंढरपुर या औद्योगिक वसाहतीमध्ये गुटखा विक्री, मटका, लॉटरी, मुरूम चोरी, गावठी दारू विक्री, वाईन शॉप, बुकी, बिअर शॉप,रेती व्यवसाय आणि गॅस रिफिलिंग असे कितीतरी अवैध व्यवसाय सुरू आहेत. या व्यवसायांना पोलिसांचे अभय असल्याचा आरोप त्यांनी केला. अवैध धंदेवाल्याकडून वसुली करण्यासाठी काही दलाल लोकांची नेमणूक केल्याचा आरोप करीत तीन जणांची नावे पत्रात नमूद केली आहेत. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.