बीड : जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार महामंडळाने १२.८३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाणी मराठवाड्याच्या हक्काचे आहे. परंतु काही व्यक्ती वारंवार न्यायालयात धाव घेऊन कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर दंड ठोठवावा, अशी मागणी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने राकाँ पक्षाचे सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल केली असून, त्यावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत, भूजल पातळीमध्ये कमालीची घट झाली आहे. मराठवाड्यातील बंधारे, धरणे आणि पाणीसाठे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरनेसुद्धा पाणीपुरवठा करताना पाणी आणायचे कोठून? हा यक्ष प्रश्न उभा आहे. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी नगर, नाशिकमधील काही व्यक्ती विरोध करीत आहेत ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. महामंडळाने १२ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्या निर्णयास अडथळा निर्माण करुन अपेक्षित पाणी येऊ दिले जात नाही. सदरील याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात न्या.अभय ओक व गडकरी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आ.अमरसिंह पंडित यांनी शारदा प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेत जायकवाडी धरणात पाणी पोहचल्यानंतर १२.८३ पाण्याचे मोजमाप करावे, अशी मागणी केली आहे. मुळा, प्रवरा, निळवंडी, गंगापूर, भंडारदरा या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाते. पाणी सोडताना मोजमाप सुरू केले तर अपेक्षित पाणी मिळत नाही, त्यामुळे जायकवाडी धरणात पाणी आल्यानंतर त्याचे मोजमाप करावे, असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. (प्रतिनिधी)
पाणी सोडण्यास अडसर ठरणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: October 25, 2015 11:34 PM