औरंगाबाद : नवीन शाळाखोल्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार समोर आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांनी शाळाखोल्यांच्या निकृष्ट बांधकामांची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला सोमवारी दिले.
औरंगाबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शाळा समिती अध्यक्षांची जिल्हा परिषद अध्यक्षा शेळके यांनी बैठक घेतली. यात जिल्हा परिषदेच्या शाळा इमारतींची झालेली दुरवस्था, जीर्ण इमारती, नव्या बांधकामांचा निकृष्ट दर्जा, स्वच्छतागृहांची गरज, पिण्याचे पाणी व थकीत वीज बिलामुळे शाळांच्या खंडित वीज जोडणीच्या समस्या मांडण्यात आल्या. शाळांच्या अडचणींची जंत्री समोर आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारत शाळांचे प्रश्न तातडीने सोडवा, अशा सूचना शेळके यांनी बांधकाम विभागाला दिल्या.
यावेळी कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले. तर नव्या शैक्षणिक वर्षात वाढत असलेली जिल्हा परिषद शाळांतील प्रवेश संख्येबद्दल शिक्षकांच्या प्रयत्नांचे व कल्पक उपक्रमांचे कौतुक केले. इंग्रजी शाळांतून विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत येताहेत. त्यावेळी सुविधा व गुणवत्ता दोघांकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी दीक्षित यांची उपस्थिती होती.