औरंगाबाद : बीड बायपासचा कोंडलेला श्वास मनपा व पोलीस यंत्रणेच्या धाडसाने मोकळा झाल्याने नागरिकांना सुखरूप प्रवासाचे गणित सुटल्याचा प्रत्यय येत आहे. सर्व्हिस रोडच्या डांबरीकरणासाठी मालमत्ताधारक मनपाकडे पाच वर्षांचा आगाऊ कर भरण्यास तयार असल्याची भूमिका सातारा-देवळाईत परिसरातील रहिवाशांनी मांडली आहे.
बीड बायपास झाल्यापासून ते आतापर्यंत दीडशेपेक्षा अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. त्यापेक्षा पुढील काळात अनेकांचे प्राण वाचविण्यासाठीचे पाऊल मनपा व पोलीस प्रशासनाने उचलल्याने त्या मृतांचे पालक व नातेवाईकांत उपेक्षेची भावना निर्माण झाली आहे. निष्पाप नागरिकांचा बळी अरुंद रस्त्यामुळे जात असेल तर रस्ता मोठा करण्यास स्थानिक नागरिकांचा देखील विरोध होताना दिसत नाही; परंतु मालमत्ता यात व्यर्थ जाता कामा नये यासाठी काही मालमत्ताधारक संघर्ष करताना दिसत आहेत.
सर्व्हिस रोड पूर्ण होईपर्यंत मोहीम सुरूच राहणार
रस्त्यावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, पोलीस आयुक्त आणि मनपा प्रशासनासमोर नागरिकांनी मांडलेल्या व्यथा पाहून रेंगाळून पडलेल्या प्रश्नाचे निराकरण करण्याचे ठरले. मोजक्या मालमत्ता वगळता इतर रस्ता जागा रिकामी असून, त्यावर सर्व्हिस रोड मोकळा करण्यास कोणतीही हारकत नाही, असे लक्षात आल्याने अखेर चौथ्या दिवशीही अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा सुरूच होता.
अखेर रस्त्याचा प्रश्न मार्गी बीड बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न मनपा व पोलीस प्रशासनाने मार्गी लावल्याने मनपाकडे आगाऊ कर भरण्यास नागरिक तयार आहेत. त्यासाठी पथक अधिकाऱ्यांकडे जाणार असल्याचे प्रा. प्रशांत अवसरमल, शोभा सुंभ, ढवलसिंग मेहेर, उमेश पटवर्धन, अनिल वाकोडे, डॉ. राजेंद्र पवार, अभयकुमार गोरे आदींसह विविध नागरिकांनी सांगितले.