छत्रपती संभाजीनगर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे अत्यंत कमी व्याजदरात १ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते; परंतु जाचक अटींमुळे गरजू या योजनेपासून वंचित राहत आहेत. गतवर्षीच्या ७० पैकी ४० लाभार्थींना धनादेश वाटप झाले. यंदा ९० चे उद्दिष्ट आहे. गतवर्षीच्या ९०० फायलींचा निपटारा झालेला नाही. राज्यातील इतर मागास वर्गातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी ही थेट कर्ज योजना १ लाख रुपयांपर्यंत रक्कम देते.
या योजनेसाठी अर्जदाराला कसलाही सहभाग हिस्सा भरावयाचा नाही. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे. अर्जदाराचा ५०० एवढा सिबिल क्रेडिट स्कोअर असणे आवश्यक आहे. एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी १ लाखांपर्यंत असावे. अर्जदाराने ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रुपये २,०८५ भरले, तर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही; परंतु नियमित कर्जाची परतफेड केली नाही, तर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. कर्जात ७५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळतो. २५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळविण्यासाठी प्रत्यक्ष उद्योग सुरू असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर ३ महिन्यांनंतर जिल्हा व्यवस्थापकांची तपासणी होते.
तोंडाला पाने पुसल्यासारखेच चेकबुक, खाते आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागते. जामीनदाराची जुळवाजुळव करताना मोठी अडचण होते. समाजातील युवकांना उद्योजक होण्यासाठी वाढीव निधीची गरज आहे.-संजय ठोकळ
रोजगाराच्या संधी कधी? बँकांना शिफारस करून उद्योगासाठी लागणाऱ्या योजनेतून तरुण उभा राहावा. यातून रोजगार निर्मितीच्या संधी मिळतील.-दशरथ मानवतकर
नियमानुसार वाटपयंदाच्या उद्दिष्टासाठी संचिका घेणे सुरू आहे. १५ ऑगस्टपर्यंत शिफारस केली जाईल. नियमानुसार कर्जवाटप होते.-किशन पवार, जिल्हा व्यवस्थापक