छत्रपती संभाजीनगर : माणसाची एखादी किडनी खराब झाली, दुदैवाने काढून टाकावी लागली तर दुसऱ्या किडनीवर तो जिवंत राहू शकतो. मात्र, जर व्यक्तीचे लिव्हर म्हणजे यकृत खराब झाले तर जिवाला धोका निर्माण होतो. यकृत प्रत्यारोपणाचीही वेळ ओढवते. मात्र, सहजासह यकृत मिळत नाही. त्यामुळे यकृताची म्हणजे आरोग्याची काळजी घेतलेली बरी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
दरवर्षी १९ एप्रिल रोजी ‘जागतिक यकृत दिन’ असतो. यकृताशी संबंधित आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस ठरला आहे. मेंदूचा अपवाद वगळता यकृत हा शरीरातील दुसरा सर्वांत मोठा आणि सर्वांत गुंतागुंतीचा अवयव आहे. खराब जीवनशैली, फास्ट फूडचा अधिक वापर, मद्यपान, धूम्रपान आदींमुळे यकृताचे आजार होऊ शकतात.
यकृताचे काय काम?शरीरातील पचनसंस्थेतील हा महत्त्वाचा घटक आहे. त्याबरोबरच रोग प्रतिकारशक्ती वाढवणे व शरीरामध्ये पोषक द्रव्ये साठवणे अशी अनेक कामे लिव्हर म्हणजे यकृताद्वारे पार पाडली जातात. यकृत अन्न पचन, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे, पित्त तयार करणे इत्यादी अनेक महत्त्वाची कार्ये करते.
फॅटी लिव्हर म्हणजे काय ?फक्त ५ टक्के चरबी लिव्हरमध्ये साठवून ठेवली जाते. यापेक्षा अधिक चरबी लिव्हरमध्ये जेव्हा साठवली जाते, तेव्हा त्याला ‘फॅटी लिव्हर’ असे म्हणतात. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज(एएफएलडी) व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज(एनएएफएलडी) हे फॅटी लिव्हरचे दोन मुख्य प्रकार आहेत. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा मद्यपान पुरुषांना होतो व नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज हा प्रामुख्याने मेटाबोलिक सिंड्रोम असणाऱ्या रुग्णांना म्हणजेच मधुमेह, लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाबामुळे व फास्ट फूडचे अत्याधिक सेवनामुळे होतो. फॅटी लिव्हरमुळे लिव्हरच्या कार्यात बिघाड होऊन रुग्णांना पोटात पाणी साठणे, पायावर व चेहऱ्यावर सूज येणे, रक्ताच्या उलट्या होणे, मळमळ होणे, भूक कमी होणे, सतत पोटात दुखणे, थकवा येणे आदी लक्षणे जाणवतात.
यकृताच्या आजाराची लक्षणे- त्वचा व डोळे पिवळ्या रंगाचे दिसणे.- वजनात झपाट्याने वाढ अथवा घट.- तळहात प्रमाणापेक्षा जास्त लालसर होणे.- भूक मंदावणे.- थकवा येणे, युरिनचा रंग बदलणे.
ही घ्या काळजी..- सकस आहार घेणे.- चरबीयुक्त पदार्थ टाळावे.- जेवणाच्या वेळा पाळणे.- विविध फळे, पालेभाज्या, कडधान्य यांचे सेवन करणे.- झोपेच्या वेळा निश्चित ठेवणे.- रोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करावा.- पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.- व्यसन टाळावे. लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवावा.
निदान करणे सोपेसोनोग्राफी व सीटी स्कॅनमुळे फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस, लिव्हर सिरोसिस, पोर्टल हायपरटेन्शन, यकृताचा कर्करोग आदी आजारांचे निदान करणे अधिक सोपे झाले आहे. फॅटी लिव्हर झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी सोनोग्राफी ही तपासणी केली जाते. सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हरचा ग्रेड तपासला जातो.- डॉ. राहुल रोजेकर, रेडिओलॉजिस्ट