औरंगाबाद : मुलाला जीव लाव, असे पत्नीला सांगत एका सलूनचालकाने बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडली.
विलास उत्तम ठाकरे असे आत्महत्या केलेल्या सलूनचालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि व्यवसाय ठप्प असल्यामुळे, त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली. कैलासनगर येथील विलास यांचे भोईवाडा येथे सलून दुकान होते. लॉकडाऊनमुळे त्यांचे दुकान गतवर्षी बंद होते. यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. या वर्षी पुन्हा लॉकडाऊन लागल्यापासून त्यांचे दुकान बंद आहे. त्यामुळे ते नैराश्यात होते.
बुधवारी ते दुकानात गेले. गळफास घेण्याच्या पंधरा-वीस मिनिटांपूर्वी त्यांनी पत्नीला फोन केला. ‘मुलाना जीव लाव’ असे सांगून फोन बंद केला. विलास यांचे शब्द ऐकून त्यांची पत्नी घाबरली. त्या तातडीने भोईवाड्याकडे निघाल्या. मात्र, तोपर्यंत विलास यांनी आपली जीवनयात्रा संपविली होती. याविषयी क्रांतिचौक ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.