लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जैवविविधतेचा संपन्न वारसा असलेल्या शहरातील सलीम अली सरोवराला हात लावण्यापूर्वी न्यायालयाचे आदेश समजून घ्यावेत, अशी विनंती डॉ. सलीम अली सरोवर संवर्धन समितीच्या वतीने मंगळवारी महापालिका आयुक्त आणि महापौरांना करण्यात आली.अलीकडेच महापौर नंदकुमार घोडेले यांनी सरोवराला भेट देऊन हे सरोवर लवकरच खुले करू, अशी घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर समितीने ही विनंती केली आहे.सलीम अली सरोवर संवर्धन समितीने सलीम अली तळ्यास जैवविविधता वारसा स्थळ घोषित करावे, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे यापूर्वीच केली आहे. पुरावे म्हणून समितीने सरोवराच्या परिसरातील जैवविविधता आणि त्यासंदर्भात सादर करण्यात आलेले शोध प्रबंध सोबत जोडलेआहेत.ही याचिका सध्या प्रलंबित आहे. २० जुलै २०१५च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सरोवरासंदर्भात तज्ज्ञ समितीचा अहवाल शिफारशींसहित राज्य शासनाला चार आठवड्यांत पाठविण्यात येईल, असे महापालिकेने म्हटले होते. मात्र, असा प्रस्ताव अद्याप शासनाकडे गेलाच नसल्याचे संवर्धन समितीने म्हटले आहे.१७ आॅक्टोबर २०१३ च्या न्यायालयाच्या आदेशानुसार सरोवराच्या जैवविविधतेला हानिकारक होईल, असे कुठलेही काम करण्याला मनाई आहे. शिवाय ८ जानेवारी २०१४ च्या न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेच्या जैवविविधता समितीने सरोवरासंदर्भात त्यांच्या शिफारशींचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा, नंतर राज्य शासनाने दोन महिन्यांत तो केंद्राकडे पाठवावा, असे नमूद करण्यात आले आहे. २१ जुलै २०१४च्या न्यायालयीन आदेशात महापालिकेने न्यायालयीन निर्देशांचा भंग केला असून, कार्यवाही का करण्यात येऊ नये, याबाबत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे, तसेच ५ सप्टेंबर २०१४ च्या न्यायालयीन आदेशानुसार, महापालिकेने न्यायालयीन आदेशाचा भंग केल्याचा मुद्दा नंतर विचारात घेतला जाईल, असे म्हटलेआहे. या सर्व न्यायालयीन आदेशांचे स्मरण देतानाच संवर्धन समितीने आदेशाच्या प्रतीही निवेदनासोबत जोडल्या आहेत. या निवेदनावर समितीचे समन्वयक अरविंद पुजारी यांची स्वाक्षरी आहे.सलीम अली सरोवर परिसरात १६ प्रकारच्या मोठ्या आणि मध्यम प्रकारच्या वृक्ष प्रजाती, ११ प्रकारची झुडुपे, ८ प्रकारच्या वेली, ३२ प्रकारच्या जमिनीवरील लहान वनस्पती, १२ प्रकारच्या पानथळ वनस्पती, १० प्रकारचे शेवाळ, १६ प्रकारचे पाणकिडे, गोगलगाई, खेकडे, ९ प्रकारचे मासे, ८ प्रकारचे साप, १५ प्रकारचे सरपटणारे प्राणी, ५ प्रकारचे बेडूक, ७ प्रकारचे बिळात राहणारे सस्तन प्राणी, १०२ प्रकारचे किडे, नाकतोडे, २३ प्रकारची फुलपाखरे, ७० प्रकारचे स्थानिक पक्षी आणि ५० प्रकारचे स्थलांतरित पक्षी आढळतात, याचे स्मरणही संवर्धन समितीने निवेदनाद्वारे करून दिले आहे.
सलीम अली सरोवराला हात लावण्यापूर्वी घ्या काळजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:34 AM